आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या दोन पोलिसांवर गुन्हा दाखल

May 15, 2011 2:31 PM0 commentsViews: 7

15 मे

नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि पोलीस कॉन्स्टेबल रमाकांत गवळी यांच्यावर आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पॅनकार्ड बनवण्याच्या प्रकरणात जामीनावर सुटलेल्या कैलास चासकर याने विष पिऊन आत्महत्या केली.

त्याने पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. कैलासचा मृतदेह पोलीस स्टेशनसमोर ठेऊन नातलगानी ठिय्या आंदोलन केल्यानंतर डीवायएसपीनी संबंधित दोन पोलिसांंवर गुन्हा दाखल केला. कैलास चासकर याचा नारायणगावमध्ये मोबाईल विक्रीचा आणि पॅनकार्ड मिळवून द्यायचा धंदा होता.

तीन महिन्यांपूर्वी कैलासला बांगलादेशींना बनावट पॅनकार्ड दिल्या प्रकरणी मंचर पोलिसांनी अटक केली. अडीच महिन्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर पोलिसांच्या तपासाचा ससेमिरा त्याच्यामागे होता. त्याला कंटाळून तो 10 मे पासून बेपत्ता होता.

त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी कैलासचा मृतदेह भोसरीमध्ये पोलिसांना आढळला. दरम्यान पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि कॉन्सटेबल रमाकांत गवळी यांचे फोन कैलासच्या पत्नीला येत होते.

शनिवारी पुण्याहून कैलासच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. मतृदेह मंचर पोलीस स्टेशनसमोर ठेऊन त्यांनी ठिय्या आंदोलन केलं.

close