कर्नाटकचा सत्तासंघर्ष दिल्ली दरबारी !

May 16, 2011 9:25 AM0 commentsViews: 5

16 मे

कर्नाटकचे नाटक आता दिल्लीत पोहचले आहे. मुख्यमंत्री येडियुरप्पा 127 आमदारांना घेऊन दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या ते राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासमोर आमदारांची परेड करणार आहेत.

कर्नाटकमधील राजकीय नाट्य चांगलंचं रंगलंय. राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी केंद्र सरकारकडे कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली.

राज्यपालांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि भाजपने तीव्र आक्षेप घेतला. येडियुरप्पा यांनी आपल्या खासदारांसह बंगळुरूत राजभवनासमोर निदर्शने केली. आणि भारद्वाज यांना हटवण्याची मागणी केली.

दुसरीकडे दिल्लीतही भाजपने भारद्वाज यांच्याविरोधात आघाडी उघडली. एनडीएची तडकाफडकी बैठक झाली. लोकांनी निवडून दिलेलं सरकार बरखास्त करण्याची शिफारस करणार्‍या राज्यपालांवर एनडीएच्या घटकपक्षांनी तीव्र टीका केली.

केंद्र सरकारच्या आदेशानुसार राज्यपाल वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. संध्याकाळी एनडीएच्या नेत्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि भारद्वाज यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

कर्नाटक विधानसभेत पूर्ण बहुमत असल्याचा दावा भाजपने केला आहे. वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करून राज्यपालांवर विश्वास टाकल्यास यूपीए सरकारला अडचणीचे ठरू शकते.

सध्याच्या परिस्थितीत येडियुरप्पा सरकार बरखास्त करणे. राजकीय घोडचूक ठरेल असं काँग्रेसमधील अनेकांना वाटतंय. पण कर्नाटक सरकारला अडचणीत आणण्याची मात्र काँग्रेसची इच्छा आहे.

दरम्यान, भाजपचे कर्नाटकातील आमदार दिल्लीत दाखल झालेत. या सर्व आमदारांची मंगळवारी राष्ट्रपतींच्या समोर परेड करण्याचा भाजपचा विचार आहे. कर्नाटकचं हे नाटक नेहमीप्रमाणेच दिल्लीच्या रस्त्यावर पोहचलंय.वादाला सुरूवात

सुप्रीम कोर्टाने 16 बंडखोर आमदारांचा अपात्रतेचा निर्णय रद्द ठरवल्यामुळे कर्नाटकात हे राजकीय नाटक पुन्हा सुरू झालंय. शिस्तभंग कारवाईखाली 11 भाजप आणि 5 अपक्ष आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होतं. त्यावर हायकोर्टाने शिक्कामोर्तब केलं होतं.

आमदारांच्या अपात्रतेमुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारी आमदारांची किमान संख्या खाली आली होती. त्यामुळे येडियुरप्पा सरकार स्थिर होतं. पण हा निर्णय सुप्रीम कोर्टाने गेल्या आठवड्यात रद्द केला.

त्यामुळे कर्नाटकातील विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी लागणारा आकडा वाढला. आणि येडियुरप्पा सरकार अडचणीत आलं. पण भाजपच्या 11 आणि 4 अपक्ष आमदारांची समजूत काढण्यात भाजपला यश आलं. आणि या आमदारांनी आपल्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे पाठवलं.

पण ते पत्र न स्वीकारता राज्यपालांनी कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केलीय. आणि हा वाद सुरू झाला.

कर्नाटक विधानसभा संख्याबळ

एकूण जागा – 225 भाजप – 119 + 1 विधानसभा अध्यक्ष + 1 अँग्लो इंडियन + 6 अपक्ष = 127 विरोधी पक्ष (काँग्रेस + जेडीएस) = 98

close