पेट्रोल दरवाढीच्या निषेधात देशभरात आंदोलन

May 16, 2011 9:39 AM0 commentsViews: 3

16 मे

पाच राज्याच्या निवडणुकीच्या निकालानंतर पेट्रोलच्या दरात शनिवारी 5 रूपयाने वाढ करण्यात आली. या दरवाढीच्या निषेधात रविवारी राज्यभरात आंदोलनं करण्यात आली.

आजही दरवाढीचे पडसाद देशभर उमटत आहे. पेट्रोलच्या दरात पाच रुपयांनी वाढ झाल्याने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विरोधकांनी देशभरात केंद्र सरकारविरुद्ध आंदोलनं सुरू केली आहेत. युपीए सरकारला धारेवर धरण्याची आणखी एक संधी साधत भाजपने आज राजधानी दिल्लीतच चक्काजाम आंदोलन केले आहे.

मुंबई

भाजपच्या कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत दरवाढीचा निषेध केला. तर कोल्हापूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीचा निषेध करत आंदोलन केलं. पुण्यातही आरपीआयचे कार्यकर्ते या दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरले.

पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ बोरीवलीत भाजपच्या वतीने सायकल मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार गोपाळ शेट्टी यांच्या नेतृत्वात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल होतं. पेट्रोल दरवाढीमुळे लोकांना सायकलच चालवावी लागेल अस शेट्टी यांनी म्हटलं आहे. या मोर्चामुळे अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झाला होता.

भाजपने ठाण्यातही पेट्रोल दरवाढीचा निषेध अनोख्या पध्दतीने केला. बैलगाडी, सायकल, घोडा गाडी घेऊन भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. दरवाढीमुळे सामान्य जनतेचं कंबरड मोडल्याची प्रतिक्रिया भाजप नेत्यांनी या वेळी दिली.पुणे

आरपीआय कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. पेट्रोल दरवाढीच्या विरोधात पुण्यात काल भाजपने रॅली काढली होती. तर आज आरपीआयनं पेट्रोल दरवाढीचा निषेध करत आंदोलन सुरू केलंय. कोल्हापूर

कोल्हापुरात पेट्रोलदरवाढी विरुध्द शिवसेनेनं आंदोलन केलं. बैलगाडीत दुचाकी ठेऊन शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. आणि त्यांनी पेट्रोल दरवाढीचा निषेध केला.

दरवाढ जनतेला लाचार बनविण्यासाठी – बाबा रामदेव

पेट्रोलच्या दरात झालेली वाढ ही जनतेला लाचार बनविण्यासाठी सरकारने केली असल्याचा आरोप योगगुरू रामदेवबाबांनी केला आहे. ते आज नांदेडमध्ये बोलत होते. पेट्रोलियम ट्रेडर्स संघटनेनं कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी

दरम्यान पेट्रोल दरवाढीने हैराण झालेल्या जनतेवर आणखी एक संकट येण्याची शक्यता आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया पेट्रोलियम ट्रेडर्स संघटनेनं कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे.

आज या मागणीसाठी पेट्रोलियम सचिवांसोबत संघटनेची बैठक झाली. पण या बैठकीत काहीही तोडगा निघू शकलेला नाही. आता डिलर्स संघटना काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

close