रायगडच्या शेतकर्‍यांनी राबवला ‘खैस’ सफाईचा मंत्र

May 16, 2011 3:12 PM0 commentsViews: 12

विनय म्हात्रे, रायगड

16 मे

रायगड जिल्ह्यात खारजमिनींवर किंवा या जमिनींच्या जवळ असलेल्या शेतीमध्ये डोंगराळ भागातून येणार्‍या पाण्याचा निचरा होत नाही आणि त्यामुळे हजारो एकर शेती पाण्याखाली जाते. पण आता चित्र हळूहळू बदलतंय.

शेतीमध्ये असलेले 'खैस' म्हणजेच नाले साफ करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत. हा निर्णय ऐतिहासिक आहे कारण हे नाले साफ करण्याचे काम शेतकरी आणि संबंधित गावातील नागरिकच करणार आहेत. गेल्या चाळीस वर्षांत किनारपट्टीच्या भागात शेतीचं जे नुकसान झालं ते आतातरी होणार नाही असा विश्वास या शेतकर्‍यांना आहे.

रेखा तुरे यांच्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढा भात त्यांच्या शेतात पिकतो. पण शेतात राबराब राबल्यानंतरसुध्दा भात मिळेलच याची आशा रेखाला नसायची, कारण दोन तास जरी मुसळधार पाऊस पडला की ही भातशेती पाण्याखाली जायची पण आता परिस्थिती बदलली आहे.

ती बद्दलली आहे खैस मुळे. डोंगरावरुन वाहत आलेलं पाणी, शेतांमधील याच खैसमधून खाडीला मिळत असतं. एक प्रकारे खैस म्हणजे शेतातून वाहणारा नालाच.

पण हे खैस साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी शेतांमध्येच साचून राहायचे अर्थातच मग शेती पाण्याखाली जायची पण आता हे खैस शेतकर्‍यांकडूनच साफ केले जात आहे आणि त्याचा मोबदलाही शेतकर्‍यांना दिला जातोय.

रागयड जिल्हयातील पेण तालुक्याचा विचार केला तर इथे 25 हजार एकर शेतीमधील या खैसांची खोली आणि रुंदी वाढवली जातेय. पुढच्या वर्षी संपूर्ण कोकण पट्टयातल्या खारजमिनीवर असलेली खैस साफ केली जाणार आहे.

फक्त खैस साफ करणेच नाही तर, गावातले रस्ते, शेतातले बांध, विहिरी यांची कामसुध्दा आता शेतकरीच एकत्र येऊन करणार आहेत. यासाठी कोणतेही ठेके किंवा कंत्राट न काढता संपूर्ण गावालाच ही कामं दिली जातील.

यामुळे शेती तर पाण्याखाली जाणार नाहीच पण हंगाम नसताना हाताला काम आणि मोबदला, खैस साफ केल्यामुळे मासेमारीतून उत्पन्न असा तिहेरी फायदा शेतकर्‍यांना मिळणार आहे. आणि म्हणूनच हा आहे एक ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.

close