आदर्श प्रकरणी बेंजामिन यांची पुन्हा चौकशीची शक्यता

May 17, 2011 11:06 AM0 commentsViews: 5

17 मे

नगरविकास खात्यातून फाईलीची पानं आणि हार्ड डिस्क गायब झाल्याप्रकरणी या खात्याचे प्रधान सचिव टी. सी. बेंजामिन अडचणीत आले आहेत. त्यांच्याच कार्यकाळात फाईलीची पानं आणि हार्डडिस्क गहाळ झाल्याचं उघड झालंय. त्यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागतंय. एकापाठोपाठ फायली आणि हार्ड डिस्क गायब होणं, हा नक्कीच योगायोग नाही असं बोललं जातंय.गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आदर्श सोसायटीशी संबंधित फाईलीतील महत्त्वाची पानं गहाळ झाल्याचे प्रकरण उघडकीला आलं होतं. याप्रकरणी आधी मुंबई पोलिसांनी आणि नंतर सीबीआयने तपास केला.

एप्रिल महिन्यात नगरविकास खात्याच्या दोन अधिकार्‍यांसह तिघांना अटक केली. नगरविकास खात्यामधल्या टाऊन प्लानिंग सेक्शनचे डेस्क ऑफिसर गुरुदत्त वाजपे, असिस्टंट टाऊन प्लानर एन. एन. नार्वेकर, नगरविकास खात्याचे प्रधान सचिव टी. सी. बेंजामिन यांचे क्लार्क वामन राऊळ यांना अटक केली.

त्यानंतर सर्व फाईलींचा रेकॉर्ड स्टोअर करणार्‍या दहा कॉप्म्यूटर्सपैकी एका कॉम्प्यूटरची हार्ड डिस्क गहाळ झाल्याचं उघडकीला आलं. याप्रकरणीसुद्धा सीबीआयकडून या तिघांची चौकशी सुरू आहे.

पण या कनिष्ठ दर्जाच्या कर्मचार्‍यांची अटक म्हणजे छोटे मासे गळाला लागण्यासारखं आहे असं या आरोपींचे वकीलच म्हणत आहे. ज्यांच्या कार्यकाळात फाईल आणि हार्ड डिस्क गहाळ झाली त्या नगरविकास खात्याचे प्रधान सचिव टी. सी. बेंजामिन यांचीही चौकशी सीबीआयने केली.

तसेच मंत्रालयातल्या कॉम्प्यूटर्सची देखभाल करणार्‍या आयटी विभाग आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यांची सुद्धा चौकशी होऊ शकते. विशेषतः टी. सी. बेंजामिन यांच्याकडूनच या प्रकरणी अधिक माहिती मिळू शकते.

त्यामुळे त्यांना पुन्हा सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. याप्रकरणी आयबीएन लोकमतजवळ स्पष्टीकरण देताना बेंजामिन यांनी म्हटलंय, 'फाईल आणि हार्ड डिस्क गहाळ प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. आपण सीबीआयला हवी ती मदत करत आहोत.'

नगरविकास विभागातली फाईलीची पानं गहाळ होणं, केंद्रीय पर्यावरण खात्यातली आदर्शची फाईल गहाळ होणं आणि नगरविकास खात्यातल्या कॉप्म्यूटरची हार्ड डिस्क गायब होणं हा नक्कीच योगायोग नाही. यामागे अति उच्च पदस्थ लोकांचा हात असल्याचा संशय घेतला जात आहे.

close