मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी एटीएसची टीम मराठवाड्यात

November 11, 2008 6:20 AM0 commentsViews: 2

11 नोव्हेंबर, मराठवाडासंजय वरकडमालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी राकेश धावडेला मराठवाड्यातल्या परभणी, पूर्णा आणि जालना मशिदींमध्ये झालेल्या स्फोटाच्या तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यासाठी एटीएसची टीम मराठवाड्यात दाखल झाली आहे.जालन्यातल्या, कादरिया मशिदीत 27 ऑगस्ट 2004 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटाच्या तपासाविषयी पोलिसांनी नेहमीच चालढकल केली. पहिले आरोपपत्र दाखल करायला वेळ लावला. शिवाय साक्षीपुरावे आणि ओळख परेडमध्ये आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण मालेगाव स्फोटामुळं, या प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा उकलण्याची चिन्हं आहेत.मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी राकेश धावडे आणि नांदेड स्फोटातला हिंमाशू पानसे यांचे संबंध उघड झाले आहेत. त्याचबरोबर जालना स्फोटातला मुख्य आरोपी मारोती केशवराव वाघ, याचेही हिंमाशूसोबत संबंध होते. हिंमाशू आणि मारोती हे दोघेही नांदेडमध्ये एकत्रच काम करत. त्यामुळं जालना, परभणी, पूर्णा येथे झालेल्या स्फोटाच्या तपासाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी सध्या या अटकेबाबत अधिक खुलासा करण्यास नकार दिला आहे. ' या प्रकणाचा तपास एटीएसकडे आहे. ते तपास करत आहेत. त्यांनी याबाबत माहिती कळवल्यानंतरच आम्हाला माहिती सांगता येईल. ' अशी प्रतिक्रिया जालन्याचे पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी दिली. नांदेडमधल्या याचं घरात बॉम्ब तयार करताना झालेल्या स्फोटात हिंमाशू पानसेचा मृत्यू झाला. जालना स्फोटातला मारोती याच्यासह अन्य चार आरोपीही नांदेडचेच आहेत.त्यांना सध्या जामिनावर सोडण्यात आलं आहे. पण नव्यानं उजेडात आलेल्या माहितीमुळे त्यांना पुन्हा ताब्यात घेतले जाण्याची शक्यता आहे.

close