भट्टा-पारसौल हत्याकांड प्रकरणी राहुल गांधींचा आरोप निराधार

May 18, 2011 6:10 PM0 commentsViews: 7

दिव्या अय्यर, भट्टा-पारसौल

18 मे

नोएडाजवळच्या भट्टा-पारसौल या गावात पोलिसांनी शेतकर्‍यांचे सामूहिक हत्याकांड केल्याचा आणि महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. याबाबतची तक्रार करण्यासाठी त्यांनी शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचीही भेट घेतली. राहुल गांधींच्या या आरोपात तथ्य आहे का हे पाहण्यासाठी सीएनएन-आयबीएनच्या टीमने भट्टा-पारसौल गावाला भेट दिली.

उत्तर प्रदेशातील शेतकर्‍यांचे आंदोलन जुलमी पद्धतीने दडपण्याचा प्रयत्न मायावती सरकार करतंय असा आरोप राहुल गांधींनी केला होता. त्यानंतर सीएनएन-आयबीएनने भट्टा-पारसौल या गावात जाऊन सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मी जवळपास 8 गावकर्‍यांना विचारलं की राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांकडे गेलेल्या शिष्टमंडळात कोण होतं..? पण कुणालाच याबद्दल माहिती नव्हती. त्यांच्या शोधासाठी आम्ही गावात फेरी मारली. पण रस्त्यांवर शुकशुकाट होता. सगळीकडे भीतीचं वातावरण होतं.

आम्हाला अखेर विमलेश सापडली. एक उत्साही शेतकरी आणि पंतप्रधानांच्या भेटीसाठी गेलेल्या चार महिलांपैकी एक. मी त्यांना थेटच विचारले भट्टा-पारसौलमध्ये सामूहिक हत्याकांड आणि महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्यात हा राहुल गांधींचा आरोप खरा आहे का ? मी तिला गावकर्‍यांच्या मृत्युबाबत विचारले. पण सत्य काय आहे ते कुणालाच माहीत नाही असं तिनं सांगितले.

7 मे रोजी पोलिसांबरोबर झालेल्या संघर्षानंतर गावातील बहुतेक पुरुष आणि मुलं पळून गेली होती. आता ते हळूहळू गावात परतत आहेत. काहीजण अजूनही गावाबाहेर आहेत. ते जखमी आहेत की फक्त बेपत्ता हे मात्र माहित नाही.

70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा राहुल गांधींनी केला आहे. पण गावात कुणीच शोक करत नाही. शिष्टमंडळातल्या इतर सदस्यांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण आम्हाला फक्त महिला किंवा गावात राहिलेले वृद्ध लोकच सापडले.

पंतप्रधानांच्या भेटीत काय झालं त्याची माहिती देण्यासाठी शेतकर्‍यांचे शिष्टमंडळ गावात कुणीच परतलं नाही. विशेष म्हणजे शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींची निवड करण्यात भट्टा-पारसौलच्या ग्रामपंचायतीचा समावेश नव्हता. बिरेंदरी आणि तिची मुलगी खुशबू यासुद्धा राहुल गांधी यांच्यासोबत दिल्लीला गेल्या होत्या. पोलिसांच्या अत्याचाराची माहिती पंतप्रधानांना सांगितल्याचा दावा त्यांनी केला.

पण त्यांनी भट्टा-पारसौलमध्ये सामूहिक हत्याकांड किंवा बलात्काराच्या घटना घडल्याचा इन्कार केला. मात्र राहुल गांधींनी असं म्हटल्याचे त्यांनी सांगितले आहे. आणि राहुल गांधींवर त्यांचा विश्वास आहे. विशेष म्हणजे राहुल गांधींना गावातल्या लोकांची भेट घेता आली नसल्याचा दावा नेहा या तरुणीनं केला आहे.

पोलिसांच्या लाठीमारापासून आपल्या आईचा बचाव करताना नेहाच्या हाताला दुखापत झाली. असं असलं तरी पोलिसांच्या अत्याचाराच्या खुणा मात्र भट्टा-पारसौलमध्ये दिसतात.

पण, पोलिसांनी लोकांना सामूहिक जाळताना किंवा बलात्कार करताना पाहिलेली एकही व्यक्ती भेटली नाही. प्रत्येकाची आपली वेगळी कहाणी आहे. इथं पडलेली ही राख शेणाची असू शकत नाही असं गावकर्‍यांचं म्हणणं आहे.

तर ही राख प्लास्टिकची असू शकते असं पोलिसांचं म्हणणं आहे. पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे. की जमिनीसाठी लढा देणारे गावकरी आपल्या लोकांवर अत्याचार होत असताना गप्प कसे बसले? एक गाव आणि अनेक वाद.भट्टा-पारसौलमध्ये नेमकं काय घडलं हे कसून चौकशीनंतरच सर्व देशाला समजेल.

दरम्यान, काँग्रेसने राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पलटी मारली आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

तर राहुल यांनी वस्तुस्थिती लक्षात घेऊनच बोलावे भट्टा-पारसौल गावातल्या महिलांना बदनाम करू नये असं भाजपनं म्हटलं आहे. पण या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी राहुल गांधी यांनी आज वारणासीत केली. पण सामूहिक हत्याकांड आणि बलात्काराच्या आरोपांचा मात्र त्यांनी उल्लेख केला नाही.

close