एपीआय जमीन घोटाळ्यात कामगारांची फसवणूक

May 23, 2011 9:52 AM0 commentsViews: 6

संजय वरकड, औरंगाबाद

23 मे

औरंगाबादच्या एपीआय जमीन घोटाळ्यातील घटनाक्रम बघितल्यानंतर हा व्यवहार नियोजनबध्दरित्या झाल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये कामगारांचीही फसवणूक करण्यात आल्याचंही आता समोर येत आहे.

कंपनीच्या जमीन विक्रीचे मुखत्यारपत्र विनोद सुराणा यांना देण्यापूर्वीच कामगारांच्या गृहनिर्माण संस्थेची जागा एपीआय कंपनीने विकून टाकली. या व्यवहारातही विनोद सुराणा यांचा सहभाग आहेच. विशेष म्हणजे ही जागा विकून कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारेल असा दावा कंपनीने केला होता आणि त्यासाठी कामगारांचे कोर्‍या बाँडवर सह्याही घेण्यात आल्या होत्या.

एपीआय कंपनीच्या जागेचा भाव आकाशाला भिडले. तेव्हाच व्यवस्थापनाला कंपनी चालविण्यापेक्षा जमीन व्यवहार करणे फायदेशीर वाटले. त्यामुळेच त्यांनी कंपनी आर्थिक डबघाईला आल्याचे सांगून कामगारांचे वेतन थकविले.

वेतन हवे असेल तर तुमच्या गृहनिर्माण संस्थेची जागा विक्री करावी लागेल असं कामगारांना सांगण्यात आलं. घरापेक्षा नोकरी महत्त्वाची म्हणून कामगार आधी गृहनिर्माण संस्थेची जागा विक्री करण्यास राजी झाले.

एपीआय कंपनीच्या जुन्या छायाचित्रात आणि त्यानजीकच असलेल्या गृहनिर्माण संस्थेची पाटी लागलेली ही जागा होती. आधी ही जागा विकण्यात आली नंतर एपीआयची पन्नास एकर जागा विक्रीस काढली. त्यासाठी कामगारांना दमदाटीही करण्यात आली.

कामगार विनायक विठ्ठल सुर्यवंशी म्हणतात, आम्हाला एकदम गेटवर थांबविण्यात आलं. त्यावेळी डोळ्यात पाणी आलं. ज्या कंपनीत आम्ही वीस वर्षे काम केलं होतं.

कामगारांच्या घराची जागा विकल्यानंतर एपीआयचे व्यवस्थापन आणि विनोद सुराणा यांनी कोट्यवधी रूपये किंमतीच्या जागेची व्यावसायिक दराने विक्री करण्याला सुरूवात केली. त्यावेळी विरोध करणार्‍या कामगारांना त्यांनी अक्षरश: भूलथापा मारल्या.

एपीआय कंपनीतल्या बाराशेपैकी 600 कामगारांना टप्प्याटप्याने घरी पाठविण्यात आले. उरलेल्या सहाशे कामगारांनाही दोन हजार सात पर्यंत झुलवत ठेवलं. आजही चाळीस कामगार एपीआयच्या या गैरव्यवहाराविरूध्द न्यायालयात खेटे मारत आहेत.

close