आयएसआयची अतिरेक्यांना मदत !

May 24, 2011 7:53 AM0 commentsViews: 5

24 मे

ओसामा बिन लादेन पाकिस्तानात मारला गेल्यानंतर अडचणीत आलेल्या पाकिस्तानला आता आणखी एक धक्का बसला आहे. पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय अतिरेक्यांना ट्रेनिंग आणि आर्थिक मदत करत असल्याची कबुली 26/11हल्ल्यातील आरोपी डेव्हीड हेडलीनं दिली आहे.

लष्कर-ए-तोयबा आणि आयएसआय या दोन्ही संघटनांमध्ये अतिरेकी हल्ले आणि आर्थिक मदतीबाबत नियमित संपर्क असतो असा गौप्यस्फोटही डेव्हीड हेडलीनं केला आहे.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड डेव्हीड हेडली यानं अमेरिकेतल्या शिकागो इथल्या कोर्टात साक्ष दिली. 26/11प्रकरणी शिकागोच्या कोर्टात तहव्वूर राणावर खटला सुरू आहे. या खटल्यादरम्यान साक्षीदार म्हणून डेव्हीड हेडलीनं ही कबुली दिली.

अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर आयएसआयनं आपल्यालाही ट्रेनिंग दिल्याचे हेडलीने सांगितले आहे. तसेच मुंबईवरील हल्ल्याची राणालाही माहिती होती असा दावाही हेडलीनं केला. दरम्यान हेडलीने दिलेली साक्ष ग्राह्य धरू नये अशी मागणी राणाच्या वकीलांनी केली आहे.

हेडलीची साक्ष

हेडली- आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबा आर्थिक आणि लष्करी मदतीसाठी एकमेकांशी संपर्कात होते. लष्कर-ए-तोयबाला अतिरेकी संघटना म्हटल्याबद्दल अमेरिकेविरुद्ध खटला दाखल करा असं मी लष्कर ला सांगितलं होतं.

पण अमेरिकेविरोधात खटला दाखल करण्यापूर्वी आयएसआयशी चर्चा करु असं लष्कर-ए-तोयबानं सांगितलं. 9/11 नंतर मला लष्कर-ए-तोयबानं प्रशिक्षण दिलं.

हेडलीच्या कबुलीनंतर पाकिस्तानला तर धक्का बसलाच आहे. पण भारताच्या आयएसआयबद्दलच्या दाव्याला पुष्टी मिळाली. हेडली आणि राणा यांना आयएसआयकडून मिळत असलेली मदत कागदपत्रांच्या स्वरूपात होती.

ही कागदपत्रं पाकिस्तानला देण्यात आली. भारताला आता ही कागदपत्रं हवी आहेत असं सूत्रांनी सांगितलं आहे. या आरोपपत्रात आयएसआयचा अधिकारी असलेल्या मेजर इक्बालवर पाकिस्तान कारवाई करणार आहे का याबद्दलही भारताला माहिती हवी आहे

close