नवलेंविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

May 25, 2011 5:02 PM0 commentsViews: 3

25 मे

पुण्यातील पवन गांधी चॅरीटेबल ट्रस्टची जमिनीबाबत फसवणूक केल्याप्रकरणी सिंहगड संस्थेचे संस्थापक मारूती नवले यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली.

पण 8 दिवस झाले तरी पुणे पोलीस नवलेंविरोधात गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहे. दुसरीकडे कराराबाबतही खोटारडेपणा केल्याचा आरोप ट्रस्टच्या विश्वस्तांनी केला आहे.

पुण्यापासून 25 किलोमीटरवर पिरंगुटजवळच्या सुतारवाडीत पवन गांधी चॅरिटेबल ट्रस्टची शाळा आहे. दिवंगत मुलाच्या स्मृती जपण्यासाठी चैनसुख गांधी यांनी या शाळेच्या माध्यमातून गरीब होतकरू मुलांना शाळा बांधली.

यासाठी सिंहगड संस्थेचे सर्वेसर्वा मारूती नवलेंशी त्यांनी 8 मार्च 2008 ते 7 मार्च 2011पर्यंत करार केला. पण करारानुसार नवले अटी पाळत नाहीत आणि त्यांच्या मनात ही जागा बळकावण्याचा डाव असल्याचं गांधीच्या लक्षात आलं. त्यामुळे गांधींनी करार संपल्यावर दुसर्‍या संस्थेला शाळा चालवायला द्यायचं ठरवलं.

मात्र नवलेंनी करारावर खाडाकोड केली आणि गांधींच्या सह्यांचा दुरूपयोग करत करार परस्पर वाढवला. इतकच नाही तर मोकळी जागा विकत घेत असल्याचं खरेदी खतही तयार केलं.

शेवटी गांधींनी या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर मीडियात हे प्रकरण आल्यानंतर नवलेंनी पत्र पाठवत 7 मार्च 2011 ला करार वाढवल्याचा दावा केला. पण गांधींनी या दिवशी आपण दिल्लीत हॉस्पिटलमधे ऍडमीट झाल्याचं पुराव्यानीशी सांगितलं.

पांैड पोलिसांनी फसवणुकीचा प्रकार पुणे शहरात घडल्याचे सांगत ही तक्रार डेक्कन पोलीस ठाण्यात वर्ग केली. तक्रार देऊन 8 दिवस झाले, तरी नवलेंविरोधात मात्र गुन्हा दाखल झालाच नाही. त्यामुळे पोलीस राजकीय दबावाकाली काम करत असल्याचा आरोप ट्रस्टचे सदस्य रवी बराटे यांनी केला.

सिंहगड इन्स्टिट्युटचे संचालक मारूती नवले कॅमेर्‍यासमोर चकार शब्दही काढायला ते तयार नाहीत. फसवणूकीचे ढळढळीत पुरावे समोर असतानाही पोलीस गुन्हा दाखल करायला तयार नाही.

गांधींना गुंडांकडून धमक्याही येत आहे. नवलेंचं पवार घराण्याशी असलेलं सख्य सगळ्यांना माहीत आहेच. असा पॉवरबाज वरदहस्त असल्यामुळेच पोलीस कारवाई करायला घाबरतायत का असा सवाल आता विचारला जातोय. शरद पवार आणि अजित पवार या प्रकरणाकडे लक्ष देणार का असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.

close