शिवसेनाप्रमुख,उध्दव ठाकरेंना मारण्याचा कट होता !

May 25, 2011 5:37 PM0 commentsViews: 8

25 मे

अमेरिकेतील शिकागो कोर्टात मुंबई हल्ल्यातला आरोपी तहव्वुर हुसेन राणा याच्या खटल्याची सुनावणी सोमवारपासून सुरू आहे. यातला मुख्य साक्षीदार डेव्हिड हेडलीनं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा आयएसआयचा कट होता असं हेडलीनं कोर्टात सांगितलं. त्याबाबत आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाशी झालेल्या चर्चेचा तपशीलही कोर्टात दिला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आयएसआय पुरस्कृत दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होते. मुंबई हल्ल्यातला सहआरोपी डेव्हिड कोलमन हेडली यानं शिकागोतल्या कोर्टात दिलेल्या साक्षीत हा गौप्यस्फोट केला. हेडली म्हणाला, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची हत्या करण्याचा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा कट होता.

शिवसेनेबाबत अधिक माहिती जमवण्यासाठी हेडलीनं राजाराम रेगे या व्यक्तीची भेट घेतली. आणि शिवसेना भवन पाहण्याची इच्छा व्यक्त केली. रेगे हे शिवसेनेचे जनसंपर्क अधिकारी असल्याचा दावा हेडलीनं कोर्टात केला. रेगे यांच्याशी हेडलीनं नंतर ई-मेलद्वारेही संपर्क साधला होता. हेडलीशी फक्त 20 मिनिटं भेट झाली होती असं रेगे यांनी स्पष्ट केलंय.

हेडलीनं लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी साजीद मीर याला एक ई-मेल पाठवला होता त्यात त्यानं लिहिलं होतं. 'बाळासाहेब ठाकरे रेगेचे बॉस उद्धव ठाकरे यांच्यासोबत अमेरिकेला जाणार आहेत. आणि त्यांना तिथंच मारता येऊ शकतं.'

हेडलीनं कोर्टात असंही सांगितलं की, 'शिवसेना ही अतिरेकी संघटना आहे, असं माझं तसेच आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचं मत होतं.'

शिवसेनाप्रमुखांनी हेडलीच्या या साक्षीवर सामनामध्ये उत्तर दिलंय. त्यांनी म्हटलं की, 'अशा हेडलीची आम्ही पर्वा करत नाही. काँग्रेसचं सरकार दुबळं असल्यानंच अशा लोकांना जोर चढला आहे. निष्ठावंत शिवसैनिक हेच माझे संरक्षण आहेत.'

शिवसेना यापूर्वीही अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर राहिली. पण हेडलीच्या आताच्या साक्षीवरून आयएसआय आणि पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनाच्या हिटलिस्टवर भारतातल्या हिंदुत्ववादी संघटना आणि त्यांचे नेते असल्याचं स्पष्ट होतं.

close