विदर्भावर फक्त प्रकल्प लादले जातात,विकास मात्र नाही – मुत्तेमवार

May 26, 2011 5:43 PM0 commentsViews: 2

26 मे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आज यवतमाळमध्ये पाणी परिषदेचं आयोजन केलं होतं. या परिषेदत विदर्भातल्या औष्णिक वीज प्रकल्पांचा मुद्दा चांगलाच गाजला.

विदर्भावर अन्याय होतोय, असा थेट आरोप काँग्रेसचे खासदार विलास मुत्तेमवार यांनी केला. इंडिया बुल्सच्या प्रकल्पाला विरोध करणारे शेतकरीही आक्रमक झाले. अखेर मुख्यमंत्र्यांनी वीजप्रकल्प, शेतीसाठी पाणी याबद्दल काही ठोस आश्‍वासनं दिली आहे. यवतमाळमधील पाणी परिषेदच्या निमित्ताने पुन्हा एकदा विदर्भात येऊ घातलेल्या वीज प्रकल्पांचा मुद्दा गाजला. आणि यावेळी निमित्त झालं विलास मुत्तेमवारांचं वक्तव्य. विदर्भावर फक्त औष्णिक प्रकल्प लादले जातात.

पाणी मात्र इतर कामांसाठी वळवलं जातं असा आरोप त्यांनी केला. सकाळपासून थंड सुरुवात झालेल्या पाणी परिषदेत अचानकपणे ऊर्जा आली. ती वीज प्रकल्पांसाठी दिल्या जाणार्‍या पाण्याच्या मुद्द्यावरून. एकीकडे विदर्भातला शेतकरी शेतीला पाणी देऊ शकत नाही.

तर दुसरीकडे डझनभर खाजगी वीज कंपन्यांना वीजप्रकल्पांसाठी परवानगी देऊन पाणी वापरण्याची मुभा सरकारने दिली. याला शेतकर्‍यांनी विरोध केला. वीज प्रकल्पांच्या या विरोधावर मुख्यमंत्र्यांनीही उत्तर दिलं.

राज्यातील एकाच भागावर या प्रकल्पाचा बोजा पडू देता कामा नये असं त्यांनी म्हटलं. पुढच्या काळात शेतीसाठी पाण्याला प्राधान्य देण्यात येईल असं आश्वासन ही मुख्यमंत्र्यांनी दिलं. एकूणच या पाणी परिषेदच्या निमित्ताने विदर्भातल्या नेत्यांनी येथील वेगवेगळ्या प्रश्नांना पुन्हा एकदा जिवंत करण्याचा प्रयत्न केला.

close