मार्ग निघाला..पण मेधा पाटकर आणि सरकारमध्ये पेच कायम

May 27, 2011 9:52 AM0 commentsViews: 10

27 मेगेल्या आठ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या मेधा पाटकर उपोषण मागे घेण्याची शक्यता आहे. मेधा पाटकरांनी मागण्या मान्य केल्यास सरकार परिपत्रक काढेल अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली.

सुधारीत परिपत्रकानुसार 2 समित्या नेमण्यात येतील. यातली एक समिती गोळीबार नगर थ्री के एसआरएसाठी असेल तर दुसरी समिती इतर 15 एसआरए प्रकल्पांच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी असेल.

या दोन्ही समित्यांमध्ये प्रत्येक 5 सदस्य असतील आणि दोन्ही समित्यांवर जस्टीस सुरेश अध्यक्ष राहतील असंही सरकारकडून या प्रस्तावात सांगण्यात आलंय.

मुख्यमंत्र्यांनी आज मेधा पाटकरांना फोन करुन उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश महाजन यांच्याशी दीड तास चर्चाही केली. त्यानंतर सरकारने हा सुधारित प्रस्ताव तयार केला आहे.

सरकारनं नेमलेल्या दोन समित्यांमध्ये कोण असेल

या दोन्ही समित्या जस्टीस सुरेश होस्बेट यांच्या अध्यक्षतेखाली काम करतील. पहिली कमिटी गोळीबार नगरातल्या गणेशकृपा सोसायटीबाबत काम करेल, त्याकरता सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव के.पी.बक्शी आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे हे सरकारचे प्रतिनिधी असतील.

तर दुसरी समिती ही एसआरएच्या पंधरा प्रकल्पासंदर्भात काम करेल त्यात महसूल विभागाचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रिय आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी झेंडे हे सरकारचे प्रतिनिधी असतील.

तर मेधा पाटकरांच्या वतीनं माजी आयपीएस अधिकारी सुधाकर सुराडकर, सिम्प्रीत सिंग या समितीचे सदस्य असतील. या दोन्ही समित्या प्रत्यक्ष स्थितीची पाहणी करुन सरकारला केवळ शिफारस करतील असं सांगण्यात आलंय.

गोळीबार नगरतल्या समस्येची चौकशी येत्या पंधरा दिवसात पूर्ण केली जाणार आहे. तर उर्वरित पंधरा एसआरए प्रकल्पाविषयी जशा तक्रारी येतील. त्याप्रमाणे चौकशी पूर्ण केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी आयबीएन लोकमतला दिली.

close