युवराज, गंभीर आऊट ; रैना कर्णधार

May 27, 2011 1:38 PM0 commentsViews: 103

27 मे

वेस्ट इंडिज दौर्‍यासाठी निवडण्यात आलेला भारतीय टीमचा कॅप्टन गौतम गंभीर विंडीज दौर्‍याला मुकणार यावर आता शिक्कामोर्तब झालंय. बीसीसीआयच्या आज झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला.

आयपीएलमध्ये गेल्या रविवारी मुंबई इंडियन्सविरुध्द झालेल्या मॅचमध्ये गंभीरच्या खांद्याला दुखापत झाली होती. गौतमला 4 ते 6 आठवडे विश्रांतीची गरज असल्याचा सल्ला कोलकाताचे फिजीओ एन्ड्र्यू लिपस यांनी बीसीसीआयला दिला होता.

पण यानंतरही गंभीर आयपीएलमध्ये खेळत होता. पण यामुळे गंभीरला पूर्ण विंडीज दौर्‍यालाच मुकावे लागले आहे. गंभीरऐवजी वन डे टीमचा कॅप्टन म्हणून सुरेश रैनाची निवड करण्यात आली आहे. तर हरभजन सिंग वन डे टीमचा व्हाईस कॅप्टन असेल. याशिवाय मनोज तिवारी आणि

शिखर धवनला वन डे टीममध्ये संधी देण्यात आली आहे. भारतीय टीममध्ये दुखापतग्रस्त खेळाडूंची संख्या आता सात झाली आहे. डावखुरा बॅट्समन युवराज सिंगनेही लंग इन्फेक्शनमुळे आपण विंडीज दौर्‍यावर जाऊ शकणार नाही असं बीसीसीआयला कळवलं आहे.

या दौर्‍यासाठी वन डे टीम काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली. या आधी सचिन तेंडुलकर, झहीर खान आणि महेंद्र सिंग धोणीने विश्रांतीच्या नावाखाली विंडीज दौर्‍यातून माघार घेतली.

तिघांनाही छोट्या मोठ्या दुखापतीही आहेतच. आणि त्यानंतर दुखापतींची रिघच लागली. आशीष नेहरा वर्ल्ड कप दरम्यान बोट फ्रॅक्चर झाल्यामुळे टीममध्ये नाही.

वीरेंद्र सेहवागच्या दुखर्‍या खांद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली. गौतम गंभीरचाही खांदा दुखावला. आणि आता युवराजनेही लंग इन्फेक्शन झाल्याचं जाहीर केलंय.

close