अखंडित वीजपुरवठा देणारं पुणे मॉडेल बंद

November 11, 2008 1:31 PM0 commentsViews: 1

10 नोव्हेंबर पुणेनितीन चौधरीलोडशेडिंगच्या काळात अखंडित वीजपुरवठा देणारं पुणे मॉडेल आता केवळ नावापुरतंच शिल्लक आहे. कारण गेल्या तीन महिन्यांपासून हे मॉडेल बंद आहे. जादा दराची वीज खरेदी करून मॉडेल सुरू ठेवण्यासाठी वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षाची परवानगी लागते. पण सध्या हे पदच रिक्त आहे. या गलथान कारभाराचा फटका मात्र पुणेकरांना बसतोय. पुणे शहरात अखंडित वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी 2006 मध्ये पुणे मॉडेलची रचना करण्यात आली. त्यानुसार कमर्शिअल आणि इंडस्ट्रियल ग्राहकांसाठी सरचार्ज लावण्यात आला. सुरुवातीला सामान्य ग्राहकांसाठी 300 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी 42 पैशांचा सरचार्ज लावला होता. त्यानंतर 2008 मध्ये हा सरचार्ज 48 पैसे करण्यात आला. यात टाटा पॉवरला वीज खरेदीची फ्रॅन्चाइझी देण्यात आली.जुलै ते ऑक्टोबर या काळात वीजेची मागणी कमी होईल असा अंदाज होता पण तो चुकला आणि पुण्यात मोठ्या प्रमाणावर लोडशेडींग सुरू झालं. यामुळे आता पुणेकरांना नॅशनल एक्सचेंजमधील जादा दराची वीज खरेदी करावी लागणार आहे. सध्या नॅशनल एक्सचेंजमधील विजेचा दर 11 रुपयांवर आहे. त्यामुळं ग्राहकांना द्यावा लागणारा सरचार्ज 48 पैशांवरून 70 ते 75 पैशांवर जाण्याची शक्यता आहे. पण यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची आणि पुणेकरांची मान्यता आवश्यक आहे. पण हा निर्णय घेण्यासाठी आयोगाकडं अध्यक्षच नाही त्यामुळे जादा दराची वीज खरेदीसाठी किमान एक ते दीड महिन्यांचा कालावधी लागेल. असं असलं तरी जादा पैसे मोजायचे की लोडशेडींग सहन करायचं हे पुणेकरांनाच ठरवावं लागणार आहे.

close