अधिकारीच घेता बिबट्याकडून हातावर तुरी !

May 29, 2011 12:20 PM0 commentsViews: 4

दीप्ती राऊत, नाशिक

29 मे

बिबट्या आणि माणसातल्या संघर्षावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठं काम सुरू आहे. चर्चाही झडत आहे. पण याची मुख्य जबाबदारी असलेले वन विभागाचे अधिकारी मात्र कोषातून बाहेरच पडायला तयार नाही. वन अधिकार्‍यांच्या या बेजबाबदारपणाचा प्रत्यय खुद्द वनमंत्र्यांनाच आला. विषय होता, नाशिक शहरात शिरणार्‍या बिबट्यांचा..

यावर्षीच्या फेब्रुवारीपासून नाशिकच्या आसपास बरेच बिबटे निघाले. इगतपुरीला पकडलेली बिबट्या मादी तीन महिने रिलीज ऑर्डरच्या प्रतीक्षेत होती. पिंजर्‍यातच तिनं दोन बछड्यांना जन्म दिला. पण काळाला हे मान्य नव्हतं ते लगेचच दगावले.

तर सुरगाण्याला सापडलेल्या बिबट्यापर्यंत फॉरेस्टची रेस्क्यू टीम पोहोचायला तब्बल 8 तासांचा उशीर झाला. चवताळलेल्या बिबट्याने तहसीलदारांवर हल्ला केला आणि लोकांनी बिबट्याचा डोळा फोडला.

जखमी अवस्थेतला हा बिबट्या नाशिकला आणला पण फॉरेस्टच्या पिंजर्‍यातून पळून तो भरवस्तीत शिरला. याला कारणीभूत होते अर्थातच भंगारपेक्षा वाईट झालेले फॉरेस्टचे पिंजरे. तुटलेल्या कड्या आणि फाटलेल्या जाळ्या. एवढी या पिंजर्‍यांची अवस्था झाली आहे.

त्यातून बिबटे पळून जातात आणि वन अधिकारी अरविंद पाटील म्हणतात, आमचे पिंजरे अगदी अत्याधुनिक आहेत. याचा पर्दाफाश वनमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेतच झाला.

पिंजर्‍यांची अवस्था वाईट असल्याचं अधिकार्‍यांनी मान्य केलं आणि ऑक्टोबरपर्यंत पिंजरे रिप्लेस करण्याचं आश्वासन दिलं. अत्याधुनिक पिंजर्‍यांच्या अशा घोषणा खूप होतात प्रत्यक्षात मात्र वन खाते फक्त बिबट्यांच्याच नाही तर परिसरात राहाणार्‍या माणसांच्याही जीवाशी खेळतंय.

close