धान्यापासून दारु बनवण्यावर बंदी

June 1, 2011 10:39 AM0 commentsViews: 18

01 जून

अन्नधान्यापासून दारूची निर्मिती करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वीच याबाबतचं धोरण रद्द करण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. पण ऊसाच्या मळीपासून मद्यनिर्मिती करण्याची प्रक्रिया मात्र कायम राहील असा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे ही माहिती आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अन्नधान्यापासून दारूनिर्मितीला समाजाच्या सर्वच स्तरांमधून विरोध झाला होता. अगदी हायकोर्टाने सुद्धा राज्य सरकारला फटकारलं होतं. त्यामुळेच राज्य सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. दरम्यान राज्याच्या व्यसनमुक्ती धोरणाला आज राज्यमंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

यामध्ये मद्यप्राशनाची वयोमर्यादा वाढवण्यात आली असून बीअरसाठी 21 वर्ष तर इतर मद्यप्राशनासाठी 25 इतकी वयोमर्यादा करण्यात आली आहे. यापूर्वी मद्यप्राशनासाठी सरसकट 21 इतकी वयोमर्यादा होती.

तसेच अवैध दारू निर्मिती आणि परवान्याशिवाय दारू विक्रीसाठी सबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची सुधारणा कायद्यात करण्यात आली आहे.

याशिवाय, एखाद्या परिसरातील लोकप्रतिनिधींनी दारूचे दुकान बंद करण्याची सूचना केल्यास त्या सूचनेवर परिसरातील लोकप्रतिनिधींचं गुप्त पद्धतीनं मतदान घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल अशीही तरतूद कायद्यात करण्यात आली असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान डॉ. अभय बंग यांनी सरकारला या निर्णयावर काही प्रश्न विचारली आहे. यापूर्वी दिलेली 36 लायसन्स रद्द होणार का ?आणि युरोपियन राष्ट्रांप्रमाणे महाराष्ट्रात दारुचा खप कमी होणार का ? असा सवाल बंग यांनी सरकारला विचारला आहे.

close