बाबा रामदेव उपोषणावर ठाम

June 1, 2011 9:20 AM0 commentsViews: 2

01 जून

अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे सावध झालेल्या केंद्र सरकारने आता बाबा रामदेव यांना वेळीच रोखण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. येत्या 4 तारखेपासून दिल्लीत आमरण उपोषण करण्याची घोषणा बाबा रामदेव यांनी केली. उपोषण रद्द करण्याची पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विनंती त्यांनी फेटाळून लावली आहे. त्यामुळे सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहे.

बाबा रामदेव दिल्लीत दाखल होताच त्यांची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्यासह चार केंद्रीय मंत्र्यांनी दिल्ली एअरपोर्टकडे धाव घातली. त्यांनी रामदेव यांच्याशी तब्बल दोन तास चर्चा केली. पण या चर्चेला यश आलं नाही. चर्चा सकारात्मक झाल्याचं बाबा रामदेव यांनी सांगितलं. पण उपोषण मात्र रद्द करणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारची चांगलीच नाचक्की झाली. त्यामुळे आता केंद्र सरकार विचारपूर्वक पावलं उचलतं आहे. पण सरकारच्या सूत्रांकडून जी माहिती मिळतेय त्यानुसार बाबांच्या अनेक मागण्या अवाजवी आहेत. तरीही त्यांच्याशी चर्चा करून आपणही भ्रष्टाचाराविषयी गंभीर असल्याचे दाखवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भ्रष्टाचाराने पोळून निघालेल्या सामान्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणं, सरकारला परवडणारं नाही आणि त्या मागण्या मान्य करणे शक्य नाही. केंद्राची सध्याची स्थिती ही अडकित्त्यात सापडलेल्या सुपारीसारखी झाली आहे. त्यामुळे बाबा विरुद्ध केंद्र सरकार हा सामना चांगलाच रंगणार अशी चिन्ह आहेत.

दरम्यान, पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या घरी तातडीची बैठक झाली. अण्णा हजारे यांच्या संकटाचा सामना कसा करायचा यावर बैठकीत चर्चा झाली. बैठकीला केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, अर्थमंत्री प्रणव मुखर्जी, दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल उपस्थित होते.

बाबांना आमच्यापेक्षा चांगली वागणूक – हेगडे

दरम्यान केंद्र सरकारने बाबा रामदेव यांना आमच्यापेक्षा चांगली वागणूक दिली. अशी नाराजी कर्नाटकचे लोकायुक्त आणि लोकपाल मसुदा समितीचे सदस्य संतोष हेगडे यांनी व्यक्त केली.

अण्णा हजारे आणि समितीतल्या इतर सदस्यांपेक्षा बाबांना जास्त चांगली वागणूक सरकारकडून मिळत असल्याचे आरोप त्यांनी केला.

close