बाबांच्या उपोषणामागे राजकीय गणित ?

June 1, 2011 6:00 PM0 commentsViews: 2

आशिष जाधव, मुंबई

01 जून

बाबा रामदेव जरी विदेशी बँकांमधील काळ्या पैशाच्या मुद्द्यावर आंदोलन करत असले तरी त्यांच्या डोक्यात मात्र राजकीय गणितं चालली आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भारत स्वाभिमान संघटनेचं पक्षात रुपांतर करण्यासाठी अनुकूल वातावरण करण्याच्या दृष्टीनंच रामदेव बाबा हे आंदोलन करत आहे अशी चर्चा आहे.

योग आणि प्राणायमाची शिबिर घेता घेता आता बाबा रामदेव दिल्लीच्या राजकीय आखाड्यापर्यंत फार लवकर पोहोचले. सर्वच राजकीय पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांशी त्यांची सलगी निर्माण झाली. त्यात त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत एक आमदारसुद्धा निवडून आणला. त्याच आमदाराने राज्यातल्या आघाडी सरकारला पाठिंबा दिला. हा पाठिंबा मिळवताना काँग्रसेच्या नेत्यांनी बाबा रामदेवांच्या नाकदुर्‍या काढल्या होत्या.

अचानक केंद्रसरकारला अंगावर घेण्याइतपत राजकीय बळ बाबा रामदेव यांच्याकडे एकाएकी आलेलं नाही. एखाद्या राजकीय पक्षाप्रमाणे बाबा रामदेवांनी आपल्या भारत स्वाभिमान या संघटनेचं जाळं संपूर्ण देशभर बळकट करायला सुरूवात केली आहे.

महाराष्ट्राच्याच विचार केला तर सध्या प्रत्येक जिल्ह्यात भारत स्वाभिमान संघटनेचे किमान पाच हजार कार्यकर्ते सक्रिय आहेत. त्यातच भरिस भर म्हणून योग शिबिरांच्या माध्यमातून बडे उद्योगपती आणि सेलिब्रिटीज्‌चा पाठिंबासुद्धा बाबा रामदेवांना मिळाला आहे.

या आंदोलनाच्या माध्यमातून बाबांना जे यश मिळेल, त्याचा फायदा काळं धन देशात आणण्यात होईल की नाही हा दूरचा मुद्दा. पण या आंदोलनाचा वापर बाबा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिडीसारखा करतील.

याच निवडणुकीत देशभरात भारत स्वाभिमानचे उमेदवार उभे करण्याची बाबांची योजना तयार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळेच त्यांच्या समर्थकांच्या आत्मविश्वास दुणावला आहे.

बाबा रामदेबाबांची ही राजकीय महत्त्वाकांक्षा आंदोलन ऐन भरात असताना उघड झाली तर मात्र बाबांच्या आंदोलनाच्या हेतूवर शंका उपस्थित करण्याची एकही संधी सत्ताधारी सोडणार नाही.

close