सोलापुरात सर्रास वाळूउपसा सुरूच ; डंपर घरावर आदळला

June 3, 2011 11:18 AM0 commentsViews: 2

03 जून

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अर्धनारी इथं मध्यरात्री वाळूनं भरलेला डंपर एका घरावर आदळला. यामुळे घाबरलेले गावकरी रात्रभर घराबाहेरच बसून होते. टिपरचा मागचा भाग आदळल्यामुळे या घराच चांगलच नुकसान झालं. सूर्यास्तानंतर वाळूउपसा करायला बंदी आहे. मात्र रात्री साधारण साडेबाराच्या सुमाराला हा टिपर घरावर आदळला.

म्हणजेच सरकारी आदेशाची पर्वा न करता अर्धनारीमध्ये अनधिकृतरित्या वाळू उपसा होतोय. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर ड्रायव्हरवर किरकोळ स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण यातले खरे गुन्हेगार वाळू ठेकेदार मोकाटच आहेत. विशेष म्हणजे अर्धनारी ग्रामपंचायतीने भीमा नदीपात्रातील वाळू उपशाला ठराव करुन बंदी घातली आहे.

मात्र जिल्हा प्रशासनाने वाळू ठेकेदारांशी संगनमत करून, नियम आणि अटी झुगारून लिलाव जाहीर केला. या वाळूपात्रातून दररोज साडेतीनशे ट्रक वाळूचा उपसा सुरू आहे. यात भर म्हणजे यांत्रिक बोटींना परवानगी नसताना 13 यांत्रिक बोटींनी दिवसरात्र वाळूचा उपसा सुरू आहे.

महसूल रक्कमही भरली जात नसल्याने शासनाचही कोट्यवधी रुपयांचे नुकसान होतं. पोलीस, खनिकर्म अधिकारी आणि जिल्हा प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

close