सरकार झुकले ; बाबांचे उपोषण मागे ?

June 4, 2011 1:52 PM0 commentsViews: 5

04 जून

बाबा रामदेवांनी आज सकाळपासून रामलीला मैदानावर उपोषण सुरू केलं. आणि बाबांना आंदोलनापासून अगोदरपासून परावृत्त करण्याचा प्रयत्नात असणार्‍या सरकारने आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी बाबांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्या आहे. आणि अखेर बाबांच्या सर्व मागण्या लेखी स्वरूपात देण्याचे आश्वासन ही सरकारने दिलं आहे. आता सरकारच्या या निर्णयावद्दल बाबा रामदेव आपलं उपोषण मागे घेणार का ? याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

बाबांच्या मागण्यांपैकी काळा पैसा राष्ट्रीय संपत्ती म्हणून जाहीर केला जाईल. ही सगळी संपत्ती सरकारी खात्यात जमा केली जाईल तसेच काळा पैसा साठवणार्‍यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल अशा प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी सरकारतर्फे स्पष्ट केलं.

यासाठी एक कमिटी बनवून पुढच्या 6 महिन्यांत अहवाल सादर केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. सरकारला बाबांच्या सगळ्या मागण्या असून तसं लेखी आश्वासनही बाबांना दिल्याचं त्यांनी म्हटलंय. पण बाबा गैरसमजातून आपलं उपोषण मागे घेत नसल्याचे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी म्हटलं आहे.

पण, रामदेव बाबांनी मात्र कपिल सिब्बल यांनी आपल्याला धोका दिला असून त्यांनी आपल्याला अशा प्रकारचे कोणतंही लेखी आश्वासन दिलं नसल्याचं म्हटलं आहे. यापुढे आपण कपिल सिब्बलांशी कोणत्याही प्रकारची चर्चा करणार नसल्याचंही रामदेव बाबांनी म्हटलं आहे.

सरकारने रामदेव बाबांच्या सहकार्‍यांच्या सहीचे पत्रही यावेळी मीडियासमोर सादर केलं. त्यामुळे ही तडजोड परवाच झाली होती का असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

बाबा रामदेवांचं आश्वासन

प.पू.स्वामी रामदेवजींच्या सहमतीनुसार जे मुद्दे आम्ही सरकारसमोर ठेवले, त्या मुद्द्यांवर सरकारने आम्हाला लिखित स्वरूपात उत्तर दिलंय. आम्हाला आश्वासन देण्यात आलंय की, सरकार या मुद्द्यांवर गांभीर्याने विचारच करणार नाही तर ठोस पावलं उचलेल.

काही मुद्द्यांवर पूर्ण सहमती झालेली नाही. पण आम्हाला विश्वास आहे क ी, दिलेल्या आश्वासनावर सरकार प्रतिबद्ध राहिल. काही मुद्द्यांवर सरकार दिलेल्या वेळेत आश्वासन पूर्ण करेल. हे सर्व मुद्दे लक्षात घेता आम्ही 4 ते 6 या वेळेत तप करू आणि या विषयावर 4 तारखेला दुपारपर्यंत घोषणा करू. – आचार्य बालकृष्ण

आज बाबांच्या सत्याग्रहाला विविध स्तरांतून पाठिंबा मिळत आहे. दिवसभरात हजारो समर्थकांनी रामलीला मैदानावर भेट दिली. मैदानावर कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाबांनी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केला.

साधू-संत व्यक्तींवर धार्मिकेतेचा आरोप करणे चुकीचं आहे. काळा पैश्यांच्या मुद्यावर जे आंदोलन केलं जात आहे ते काही व्यक्तीगत आंदोलन नाही हे देश हितासाठी केलं जातं आहे. काही माथेफिरू लोकांनी या आंदोलनासाठी एवढा पैसा आला कुठून असा सवाल उपस्थित केला.

या लोकांना एवढंच सांगणं आहे की हा पैसा लोकांच्या देणगीतून उभा राहिला आहे. इथं उभारण्यात आलेलं मंडप हे लोकाच्या पैश्यातून लोकांच्या सोईसाठी बांधण्यात आलं आहे. या मागे आपला कोणताही राजकीय हेतू नाही यासाठी आपण संपूर्ण आयुष्यात कोणत्या पक्षाचे राजकीय पदभार स्विकारणार नाही. अशी ग्वाही बाबा रामदेव यांनी दिली.

close