छोट्या गाड्यांना पेट्रोल किंमतीचा फटका

June 6, 2011 3:55 PM0 commentsViews: 7

06 जून

सध्या डिझेलच्या तुलनेत पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. आणि याचा परिणाम गाड्यांच्या विक्रीवर झाला आहे. डिझेल गाड्यासाठीची मागणी वाढली आहे. त्यामुळे आतापर्यंत सगळ्यात जास्त गाड्या विकणार्‍या मारूती सुझुकीसोबतच अनेक कंपन्यांना याचा फटका बसला आहे.

देशातली सगळ्यात मोठी कार कंपनी म्हणून मारुती प्रसिद्ध. पण इतकी वर्षं होऊनही डिझेल टेक्नॉलॉजीकडे दुर्लक्ष केल्याचा फटका आता कंपनीला बसतोय. पेट्रोलच्या वाढत्या किंमतींसोबत मारुतीच्या गाड्यांची विक्री कमी होत चालली आहे.

स्मॉल कार्सच्या ए 2 सेगमेंटमध्ये मारूतीच्या सगळ्यात जास्त गाड्या विकल्या जातात. या सेगमेंटमध्ये मारुतीची अल्टो, वॅगन आर, झेन, स्विफ्ट, रिट्झ आणि ए स्टार ही मॉडेल्स आहेत.

गेल्या वर्षीच्या मे महिन्यात यासगळ्या मॉडेल्सची मिळून 62,500 गाड्यांची विक्री झाली होती. या वर्षीच्या मे महिन्यात 61,000 गाड्यांची विक्री झाली आहे. होंडा कंपनीलाही याचा फटका बसलाय कारण त्यांच्याकडे डिझेल मॉडेलच नाही. याचा परिणाम होंडा सिएल आणि होंडा सिटीच्या विक्रीवर झाला आहे.

एरवीपेक्षा 20 टक्के ग्राहक डिझेल कारची चौकशी करत असल्याचे मारुती कंपनीने म्हटलं आहे. पेट्रोल कारचा विचार करणार्‍यांची संख्या मात्र झपाट्याने घटली आहे. पण आता डिझेलच्याही किंमती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे या किंमती किती वाढतायत यावरच कार कंपन्या नवीन डिझेल मॉडेल्स आणण्याचा विचार करणार आहेत.

close