आघाडीचे वाजवा बारा !

June 9, 2011 10:54 AM0 commentsViews: 17

09 जून

आज शिवशक्ती – भीमशक्तीच्या महामेळाव्याचे मुंबईतल्या आझाद मैदानावर आयोजन करण्यात आलं आहे. जोरदार पावसात ही युतीचा मेळावा पार पडला. पावसाच्या पडताय जोरदार धारा,आता आघाडीचे वाजवू बारा अशा वाक्याने रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाला सुरवात केली.तसेच शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती अभेद्य आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा बदला घेण्यासाठी ही युती केल्याचे यावेळी रामदास आठवले यांनी सांगितलं.

इतकचं नाही तर उद्या सेना-भाजप आणि आरपीआयचे सरकार येणारच हा आत्मविश्वासही रामदास आठवले यांनी व्यक्त केला. हे आघाडी सरकार उखडून टाकण्यासाठी शिवशक्ती – भीमशक्तीला पाठिंबा देण्याचे आवाहनही रामदास आठवलेंनी यावेळी केलं. तर काँग्रेस राष्ट्रवादीने राज्याच्या चिखल केला आहे.

आघाडीवर आपली वीज चमकेल आणि सत्ता आपल्या युतीकडे येईल असा विश्वास शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवला. त्याचबरोबर या आघाडी सरकारने गरिबांसाठी काय काय केलं असा सवालही त्यांनी सरकारला विचारला आहे. त्याचबरोबर शिवसेनाप्रमुखांनी काय केलं ते गोरगरिबांना विचारा असा टोलाही त्यांनी अजित पवारांना हाणला.

गेला महिनाभर चर्चेत असलेला शिवशक्ती- भिमशक्ती आणि भाजप महायुतीचा मेळावा अखेर पार पडला. पण जितकी चर्चा या महामोर्चाची झाली तितका यशस्वी हा मोर्चा झाला नाही.

60 फुटी भव्य स्टेज, निळ्या आणि भगव्या झेंड्यांनी भरून गेलेलं आझाद मैदान आणि तिन्ही पक्षांच्या दिग्गज नेत्यांची मांदियाळी अशा वातावरणात शिवशक्ती आणि भीमशक्तीने आपल्या मुंबईच्या बालेकिल्ल्यात पहिल्यांदाच आपला एकत्रित जोर आजमावला. प्रमुख वक्त्यांनीसुद्धा आपली राजकीय भूमिका स्पष्ट करत गेल्या काही दिवसांतल्या या महायुतीवर होत असलेल्या टिकेला उत्तर दिलं.

या महायुतीतला स्थानिक पातळीवरचा मोठा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेसमोर गर्दी जमवण्याचे प्रमुख आव्हान होतं. मेळाव्याला रेकॉर्डब्रे गर्दी होईल असा दावा महायुतीतल्या नेत्यांनी केला होता. पण अचानक आलेल्या पावसानं मेऴाव्याच्या आयोजनावर पाणी फिरवलं.

खरंतर हा मोर्चा वाढती महागाई, दलितांवर होणारे अत्याचार आणि सरकारी पातळीवर होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात होता. पण एखाद-दुसर्‍या वक्त्याचा अपवाद वगळता बहुतांशी वक्त्यांच्या भाषणात हे मुद्दे आलेच नाहीत.

त्यातच गोपिनाथ मुंडेंच्या नाराजीमुळे त्यांच्या मेळाव्यातल्या गैरहजेरी बद्दल उलटसुलट चर्चेला उत आला होता. या गोष्टींचा विचार करुन या महायुतीतल्या तिन्ही पक्षांना भविष्यकाळात पाऊलं टाकावी लागतील.

close