आम्ही तर शेजारी – शेजारी !

June 10, 2011 11:40 AM0 commentsViews: 12

10 जून

आझाद मैदानावर झालेल्या शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्यात गोपीनाथ मुंडे अनुपस्थित होते आणि त्यांची नाराजी पुन्हा एकदा दिसून आली. मुंडे यावर काहीच बोलत नाहीत त्यामुळे चर्चेलासुध्दा उधाण आलं. त्यातच आता विलासराव देशमुख यांनी याच प्रकरणात खास देशमुख स्टाईलमध्ये काही संकेत द्यायचा प्रयत्न केला आहे.

मुंबईत विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचा फ्लॅट वरळीत पूर्णा या एकाच इमारतीत आहे. सध्या विलासराव मुंबईत आहेत. आज जेव्हा दुपारी ते जेव्हा पूर्णामधून बाहेर पडत होते तेव्हा पत्रकारांनी त्यांना गाठलं आणि मग विलासराव हसत हसत म्हणाले की, आम्ही तर शेजारी आहोत. इथं ही आणि तिथं ही आहोत. गोपीनाथ मुंडे यांच्याशी भेट झाली. लातूर आणि बीड तर शेजारी आहे आणि आम्ही नेहमी शेजारी शेजारी राहत आलो आहे अशा शब्दात विलासराव देशमुखांनी आपल्या शैलीत पत्रकारांना उत्तर दिली.

भाजपमधली गोपीनाथ मुंडेंची नाराजी नवी नाही. तसेच मुंडेची काँग्रेसच्या नेत्यांबरोबरची सलगीदेखील भाजप नेत्यांना चांगलीच परिचित आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशी नितीन गडकरींची भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक केली तशी गोपीनाथ मुंडेंची चलबिचल वाढलीय.

त्यामुळे गोपीनाथ मुंडे आज ना उद्या ओबीसीचा प्रयोग करतील किंवा काँग्रेसच्या मार्गावर जातील अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नेहमीच असते. त्यातच उमा भारतीच्या भाजप प्रवेश झाला आणि गोपीनाथ मुंडे चांगलेच अस्वस्थ झाले.

सूत्रांच्या माहितीनुसार गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख कामाला लागले आहेत. विलासरावांनीच बुधवारी दिल्लीत गोपीनाथ मुंडेची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखजीर्ंशी भेट घडवून आणली.

त्यानंतर गुरूवारच्या मुंबईमधील शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्याला मुंडे गैरहजर राहिले.सध्या गोपीनाथ मुंडे प्रसारमाध्यमाशी बोलत नाही. पण ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याला खुद्द विलासरावांनीच नकळत दुजोरा दिला.

वाढतं वय आणि इतर पक्षातल्या ओबीसी नेत्यांची झालेली पंचाईत यामुळे गोपीनाथ मुंडेंना ओबीसीचा प्रयोग करणं जड जाणार आहे. त्यामानाने काँग्रेसचा पर्याय हा कधीही चांगला असा विचार गोपीनाथ मुंडे करत असावेत.

close