अस्मानी संकटाना तोंड देण्यासाठी डॉप्लर रडार

June 10, 2011 12:44 PM0 commentsViews: 25

उदय जाधव, मुंबई

10 जून

26 जुलैच्या महाप्रलयानंतर मुंबईत डॉप्लर रडार बसवण्याची योजना सरकारने जाहीर केली होती. पण हे डॉप्लर रडार बसवण्यात गेल्या सहा वर्षात अनेक अडचणी आल्या होत्या. पण आता सर्व अडचणींचा अडथळा पार करत डॉप्लर रडार मुंबईसह नागपूरमध्ये बसवण्यात आलं आहे. या डॉप्लर रडारमुळे नैसर्गीक संकटांचा मुकाबला करता येऊ शकतो.

26 जुलै 2005 ला आतापर्यंतचे सगळे रेकॉर्ड मोडत मुंबईत 24 तासात तब्बल 940 मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे मुंबईच्या मिठी नदीला महापुर आला तर कमी उंचीच्या भागात पाणी भरुन मुंबई जलमय झाली.

या अस्मानी संकटामुळे पाचशेहुन अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. जर या नैसर्गीक संकटाची सुचना आधीच मिळाली असती तर कदाचीत कमी नुकसान होऊ शकलं असतं.

मुसळधार पाऊस पाडणारे ढग आणि समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादळ, यांची आधीच माहिती मिळवण्यासाठी सध्या जगात डॉप्लर रडार हे सर्वाधिक विश्वासार्थ तंत्रज्ञान आहे. त्यामुळे मुंबईत देखिल डॉप्लर रडार बसवण्याची योजना सरकारने आखली. पण या योजनेअंतर्गत डॉप्लर रडार मुंबईत प्रत्यक्षात सुरू व्हायला सहा वर्ष लागली आहे.

डॉप्लर रडारमुळे परिसरातील चारशे किलोमीटर पर्यंत पावसाळी ढगांची आणि चक्रीवादळांची माहिती मिळू शकते. त्यामुळे येणार्‍या संकटावर खबरदारीचे उपाय योजता येऊ शकतात.

संकटं कधीच सांगून येत नाहीत. त्यामुळे त्यांचा मुकाबला करण्यासाठी आपण नेहमीच सज्ज असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी डॉप्लर रडार एक महत्त्वाचं साधन ठरु शकतं.

close