मुंडेंना सबुरीने घेण्याचा उध्दव ठाकरेंचा सल्ला

June 12, 2011 4:36 PM0 commentsViews: 8

12 जून

भाजपचे नाराज झालेले नेते गोपिनाथ मुंडे आणि शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांची आज एक बैठक झाली. या बैठकीत या दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. यावेळी पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळलेल्या मुंडेंची उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवशक्ती आणि भीमशक्ती एकीकरणाच्या प्रक्रीयेत गोपिनाथ मुंडे यांनी नाराजी परवडणार नाही ही बाब उद्धव ठाकरेंना ठाऊक असल्यामुळे उद्धव यांनी मुंडेंना सबुरीने निर्णय घेण्याचा सल्ला दिला. मुंबईतील ताज लँड्स एंड या हॉटेलमध्ये ही बैठक झाल्याचं कळतंय.

भाजपमधील गोपीनाथ मुंडेंची नाराजी नवी नाही. तसेच मुंडेची काँग्रेसच्या नेत्यांबरोबरची सलगीदेखील भाजप नेत्यांना चांगलीच परिचित आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जशी नितीन गडकरींची भाजपची राष्ट्रीय अध्यक्षपदी नेमणूक केली तशी गोपीनाथ मुंडेंची चलबिचल वाढलीय.

त्यामुळे गोपीनाथ मुंडे आज ना उद्या ओबीसीचा प्रयोग करतील किंवा काँग्रेसच्या मार्गावर जातील अशी चर्चा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नेहमीच असते. त्यातच उमा भारतीच्या भाजप प्रवेश झाला आणि गोपीनाथ मुंडे चांगलेच अस्वस्थ झाले. सूत्रांच्या माहितीनुसार गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये आणण्यासाठी केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख कामाला लागले आहेत.

विलासरावांनीच बुधवारी दिल्लीत गोपीनाथ मुंडेची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखजीर्ंशी भेट घडवून आणली. त्यानंतर गुरूवारच्या मुंबईमधील शिवशक्ती-भीमशक्ती मेळाव्याला मुंडे गैरहजर राहिले.सध्या गोपीनाथ मुंडे प्रसारमाध्यमाशी बोलत नाही. पण ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्याला खुद्द विलासरावांनीच नकळत दुजोरा दिला.

वाढतं वय आणि इतर पक्षातल्या ओबीसी नेत्यांची झालेली पंचाईत यामुळे गोपीनाथ मुंडेंना ओबीसीचा प्रयोग करणं जड जाणार आहे. त्यामानाने काँग्रेसचा पर्याय हा कधीही चांगला असा विचार गोपीनाथ मुंडे करत असावेत.

close