वळू पकडून द्या, थेट अजितदादांनाच साकडं

June 13, 2011 6:11 PM0 commentsViews: 138

जितेंद्र जाधव, बारामती

13 जून

अनेक मागण्या घेऊन लोक मंत्र्यांकडे जात असतात. मागण्यांचा त्यांच्याकडे खच पडलेला असतो. यात लोक कधी काय मागणी करतील याचा नेम नसतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही असाच एक अनुभव आला. बारामतीजवळच्या मेखळी गावकर्‍यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे एक अनोख साकडं घातलंय. काहीही करा, गावाला त्रास देणारा वळूचा बंदोबस्त करा.

गावात सोडलेल्या वळूची किती दहशत असते हे आपण सिनेमात तर पाहिलं. पण मेखळी गावच्या गावकर्‍यांनी वळूचा बंदोबस्त करण्यासाठी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच साकडं घातलं.

अजितदादा भलेही मी मी म्हणणार्‍या राजकारण्यांना शिंगावर घेत असतील परंतु खर्‍याखुर्‍या वळूंचा ते बंदोबस्त करू शकतील का याबाबत अनेकांना शंका होती. पण आपण त्यातही बरेच मुरलेलो आहोत हे त्यांनी स्वत:च सांगितलं. मी स्वत: गावात काही सहकार्‍यांसोबत वळू पकडण्याला जायचो एकदा एका वळूला टॅक्टरच्या घेरा घालून गावाबाहेर सोडलं होतं असा किस्सा ही अजितदादांनी यावेळी सांगितलं.

वळू पकडण्याचे ते दिवस आठवत मग दादांनी वळू पकडण्यासाठी साकडं घालणार्‍या गावकर्‍यांचीच गालातल्या गालात हसत खिल्ली उडवली. अजित पवार म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांकडे सांगतो की मला सुट्टी द्या, मीच वळू पकडायला येतो.

खरंतर, वळूच्या त्रासामुळे मेखळीचे गावकरी बरेच त्रासले आहेत. आता दादाच त्या वळूचा चांगला बंदोबस्त करतील अशी या गावकर्‍यांची भाबडी आशा. दादांना तरी गावकर्‍यांच्या मागणीचं आश्चर्य वाटलेलं दिसलं आणि गावकर्‍यांची दादांच्या कॉमेडीने चांगलीच करमणूक झाली. अर्थात इकडे गावात वळूची टगेगिरी सुरुच आहे.

close