सरकार आणि अण्णांच्या टीममध्ये तूतूमैंमैं

June 13, 2011 5:44 PM0 commentsViews: 8

13 जून

लोकपाल कक्षेत पंतप्रधानांना का घ्यायचं नाही यावरुन सरकार आणि अण्णांच्या टीममध्ये तूतूमैंमैं रंगत आहे. आणि त्यामुळेच लोकपाल संयुक्त समितीची पंधरावी बैठक वादळी ठरण्याची शक्यता आहे.

बाबा रामदेव यांचं आंदोलन थांबवल्यानंतर केंद्र सरकारने आता आपला मोर्चा अण्णा हजारेंकडे वळवल्याचं दिसतंय. लोकपालाच्या कक्षेतून पंतप्रधानांना वगळल्यानंतर अण्णा हजारेंच्या टीमने सरकारवर हल्ला चढवला. अण्णा संघाचे हस्तक असल्याचा आरोप केला. त्यावरुन अण्णांनी पंतप्रधानांना पत्र लिहिलं. पंतप्रधान लोकपालाच्या कक्षेत यायला का घाबरतात असा सवाल अण्णांच्या टीमने उपस्थित केला.

मध्यंतरी अण्णा हजारे बंगळूरुला जाऊन आले. तिथं त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडलं. तिथं गेल्यानंतर त्यांना येडियुरप्पा सरकारचा भ्रष्टाचार कसा दिसला नाही अशी टिप्पणी काँग्रेसने केली.

दरम्यान, पंतप्रधानांना लोकपालाच्या कक्षेत घ्यावे या आपल्या विधानावर काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी घूमजाव केलंय. आता ते म्हणतात याबाबतचा जो काही निर्णय आहे तो लोकपाल मसुदा समितीच घेईल.

अण्णा हजारे यांच्यावरुन सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच तूतूमैंमैं सुरु आहे. काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले असल्याची टीका भाजपनं केली.

बाबा रामदेव यांचं आंदोलन संपवल्यानंतर सोनिया गांधींनी सरकारला कडक कारवाई करण्याची तंबी दिली. त्यानंतर आता सरकारने आपला मोर्चा अण्णांकडे वळवला. लोकपाल संयुक्त समितीची यापुढे होणारी बैठक कदाचित शेवटची असू शकते अशी चर्चाही ऐकू येऊ लागली आहे.

close