कोकणात उघड्या खाणी पावसाळ्यात धोकादायक

June 14, 2011 3:38 PM0 commentsViews: 32

14 जून

कोकणातील वापरात नसलेल्या जांभा दगडाच्या अनेक खाणी उघड्या असल्यामुळे धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यात या खाणीत पाणी भरल्यामुळे या खाणींचा अंदाज येत नाही. दोन दिवसांपूर्वी गुहागर तालुक्यातील अडुरे गावात अशाच एका खाणीत पडल्यामुळे दोन लहान मुलांचा बुडून मृत्यू झाला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड शहरातल्या देवगड सडा शाळेजवळच वापरात नसलेली चिरेखाण गेली अनेक वर्षं उघडी आहे. शिवाय अनेक ठिकाणी शेतकर्‍यांची गुरं या खाणीत पडून दगावण्याचे प्रकार झाले आहे. खाणीतून दगड काढून झाल्यानंतर ती खाण जमीन मालकाने किंवा ठेकेदाराने पुन्हा मातीने भरू न घ्यायची असा नियम आहे.

मात्र प्रशासनाकडून याबाबत कोणतीही पाहणी केली जात नसल्यामुळे बहुसंख्य खाणी अशा उघड्याच आहेत. खेड तालुक्यात 32 चिरेखाणी आहेत. अशा उघड्या खाणींमुळे गंभीर धोका असल्याचे रहिवाशांचे म्हणणं आहे. तर खाणी बुजवण्याची जबाबदारी तहसीलदारांची असल्याचे खनिकर्म अधिकार्‍यांनी म्हटलं आहे.

close