भाजप नेत्यांमधील सुंदोपसुंदी शिगेला

June 14, 2011 4:35 PM0 commentsViews: 5

14 जून

भाजपमधील गडकरी – मुंडे वाद चिघळला आहे. दोघांनीही आर किंवा पारची लढाई लढण्याचा निर्धार केलेला दिसतोय. त्यामुळेच भाजपमध्ये शहकाटशहाचा डाव खेळला जातोय. पण यात भाजपमधील अस्वस्थता मात्र उघड झाली आहे.

भाजपमधील नेत्यांमधली सुंदोपसुंदी आता चांगलीच शिगेला पोहचली आहे. गोपीनाथ मुंडे मुंबईमध्ये रुसून बसले आहेत. तर दुसरीकडे दिल्लीतले भाजपश्रेष्ठी सुद्धा मुंडेंना दाद देत नाही. सध्याच्या पेच प्रसंगाला गडकरी-मुंडे चिघळलेला श्रेष्ठत्वाचा वाद कारणीभूत असल्याचं स्पष्ट झालंय.

नितीन गडकरींनी एकामागून एक खेळी रचून गोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांना डावलण्याचा कार्यक्रमच हाती घेतल्याचे दिसतंय आधी पुणे शहर अध्यक्षपद विकास मठकरींना आणि आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद विनोद तावडेंना देण्याचा निर्णय भाजपच्या संसदीय मंडळाने घेतलेला आहे.

पांडुरंग फुंडकरांना हटवून त्यांच्याजागी विनोद तावडेंची होऊ घातलेल्या निवडीचा मुद्दा मुंडेंनी प्रतिष्ठेचा बनवला आहे. त्यामुळे त्यांच्या अवस्थतेमध्ये आणखीनच भर पडली आहे.

मुंडे खरं बोलण्याचे टाळत असले तरी त्यांची देहबोली मात्र सगळं काही सांगून जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंडे समर्थक पांडुरंग फुंडकर यांना हटवून विनोद तावडेंच्या निवडीची घोषणा येत्या पावसाळी अधिवेशनात करण्याचा नितीन गडकरींचा मानस आहे. त्यामुळेच मुंडेंनी आर या पार की लढाई लढण्याचा निर्धार केलेला आहे. मुंडेंना त्यांच्या समर्थक आमदारांचाही पाठिंबा मिळतोय.

मुंडे रुसून बसले आहेत, त्यांनी टोकाची भूमिका घेण्याचा निर्वाणीचा इशारा भाजप श्रेष्ठींना दिला आहे. पण तरीसुद्धा भाजपश्रेष्ठी मुंडेंना दाद देत नाह हेही तितकंच खरं आहे. दिल्लीला गेलेले एकनाथ खडसे मुंडेंचा मार्ग मोकळा करतात की स्वतःचं पक्षातील नवं समीकरण जुळवून येतात हीही चर्चा सध्या रंगली आहे.

close