प्रशासन आणि व्यापार्‍यांचा वादामुळे शेतकरी हैराण

June 15, 2011 3:36 PM0 commentsViews: 4

संजय वरकड, औरंगाबाद

15 जून

मराठवाड्यातील व्यापार्‍यांनी खतांची साठवणूक केल्याचे अनेक ठिकाणी पडलेल्या छाप्यात स्पष्ट झाल्यानंतर आता व्यापार्‍यांनी सरकारच्या लिकिंगविरूध्दच बंड पुकारले आहे. सरकार आणि व्यापार्‍यांच्या या संघर्षात मात्र शेतकर्‍यांचीच अडवणूक आणि पिळवणूक होत आहे. औरंगाबाद रेल्वेस्थानकावर पावसात खतं भिजल्यानंतरही व्यापार्‍यांनी सरकारविरूध्द दंड थोपटले. त्यामुळे अजूनही रेल्वेस्थानकावर दोन हजार चारशे मेट्रीक टन खतांचा साठा पडून आहे.

औरंगाबाद शहरात कृषी विभागाने याच गोदामावर मारलेल्या छाप्यात आठ लाख रूपये किमंतीच्या खतं आणि बियाणांचा साठा आढळून आला. कृषि विभागाने चौकशी सुरू असल्याच्या नावाखाली याप्रकरणात गुन्हाही नोंदविला नाही. जालन्यातही तब्बल एक कोटी रूपयांचा खतांचा साठा पकडण्यात आला.

यापूर्वी औरंगाबादच्या रेल्वेस्थानकावरही खतांचा साठा पावसात भिजला होता. त्यात भर म्हणजे, प्रशासन आणि व्यापार्‍यांमधला संघर्ष. परिणामी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर दोन हजार चारशे मेट्रीक टन खत पडून आहे.

आधी भिजलेला खतांचा साठा आणि आता हा रेल्वेस्थानाकावर अक्षरश: उघडयावर पडलेला हा खतांचा साठा. व्यापारी हा साठा उचलण्यास अजिबात तयार नाहीत. वाहतुकीचा खर्च आणि लिंकिंकचा प्रश्न सोडवा मगच साठा उचलतो असा पवित्रा व्यापार्‍यांनी घेतला. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रफ्फुल मालाणी म्हणतात, वाहतुकीचा खर्च व लिंकिगचा विषय आहे. म्हणून कुठल्याही परिस्थितीत व्यापारी माल उचलणार नाहीत. एकीकडे शेतकर्‍यांना खत मिळत नाही तर दुसरीकडे साठेबाजी आणि गोदामात खत पडून असल्याच दुर्देवी चित्र मराठवाड्यात बघायला मिळत आहे.

एकूणच बियाणं कंपन्या, व्यापारी आणि सरकारच्या संघर्षात मरण होतयं ते शेतकर्‍यांचं. आगामी काळात या संघर्षातून कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो.

close