होम लोन महागण्याची शक्यता

June 16, 2011 9:23 AM0 commentsViews: 3

16 जून

आरबीआय आज पतधोरणाचा आढावा घेत त्यानुसार पावलं उचलली आहे. महागाईचा दर 9.06 टक्क्यांवर पुन्हा एकदा पोहोचला आहे. आणि तो आटोक्यात आणणं आरबीआय समोरचं उद्दिष्ट आहे. याचा परिणाम आता अर्थव्यवस्थेच्या प्रगतीवरही व्हायला लागला आहे.

महागाई आटोक्यात आणण्यासाठी आरबीआय बँकांसाठीच्या व्याजदरात वाढ केली आहे. आरबीआयने रिव्हर्स रेपो रेट 6.50 टक्के केला. तर रेपो रेट पाव टक्के वाढवून 7.5 केलेला आहे. या दोन्ही दरांमुळे बँकांना आरबीआयकडून मिळणारा कर्ज पुरवठा महाग होतो.

ही दरवाढ मार्च 2010 पासूनची बँकांसाठीच्या व्याजदरातली 10 वी दरवाढ आहे. यासोबतच आरबीआयने अर्थव्यवस्थेविषयीचे निरीक्षण नोंदवलं आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या दराविषयी सध्यातरी काळजी नसल्याचे आरबीआयने म्हटलं आहे. सोबतच मान्सूनच्या प्रगतीविषयीही समाधान व्यक्त केलंय.

याचा परिणाम सामान्यांसाठीचे होम लोनचे आणि इतर कर्जांचे व्याजदर वाढण्यात होऊ शकतो. काही बँकांनी लगेचच याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली. येत्या आठवडाभरात व्याजदरांविषयीचा निर्णय घेणार असल्याचे एचडीएफसीने म्हटलं आहे. तर इतक्यात व्याजदर वाढवण्यात येणार नसल्याचे ओरियंटल बँक ऑफ कॉमर्सने म्हटलं आहे.

आरबीआयने बँकांसाठीचे व्याजदर अर्धा टक्क्याने वाढवले असते तर मात्र होम लोन महाग करावे असतं असं ओरियंटल बँकेने म्हटलं आहे. युनियन बँकेनेही आपण कर्जाचे व्याजदर इतक्यात वाढवणार नसल्याचं स्पष्ट केलं.

महागाई आटोक्यात येण्यासाठी डिसेंबरपर्यंतचा कालावधी लागणार असल्याचे स्टॅण्डर्ड चार्टर्डने म्हटलं आहे. तर आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर यांनी मात्र व्याजदर वाढवण्याची गरज व्यक्त केली. यामुळे इएम आय वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय.

close