कोकणात पावसाचा कहर

June 17, 2011 1:49 PM0 commentsViews: 90

17 जून

कोकणात गेल्या 15 दिवसांत रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. रत्नागिरीतही भरपूर पाऊस सुरू आहे. खेडमधील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. खेड शहरात जगबूडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे खेड शहरात पाणी घुसलं आहे. पुराचे पाणी मच्छी मार्केट, जामा मशीद चौक ातही भरलं. तर चिपळूणमध्येही वशिष्टी नदीने धोक्याची पातळी ओलांडली – चोरद आणि नारंगी नद्यांना पूर आला आहे. खेडमधील सगळ्या प्राथमिक शाळा सोडण्यात आल्या आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली चिपळूणमधील वशिष्ठी नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. चिपळूण नगरपरिषदेने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास धोक्याचा सायरन वाजवून याबाबत नागरीकांना सतर्क केलं. वशिष्ठीतला गाळ काढल्यामुळे चिपळूण शहरात पाणी भरण्याचा धोका नसला तरीही नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं.

रेल्वेमार्गावर भिंत कोसळली

पोमेंडी येथे कोकण रेल्वेमार्गावर संरक्षण भिंत कोसळल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना रत्नागिरी स्टेशनपासून आडवली स्टेशनकडे एस. टी. बसनं नेण्यात येतं. त्या ठिकाणाहून दुसर्‍या ट्रेनमधून या प्रवाशांना गोव्याकडे पाठवण्यात येतं आहे. यामुळे रत्नागिरी स्टेशनवर रेल्वे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. गोव्याकडे जाणारे तसेच मुंबईकडे जाणार्‍या या प्रवाशांचा यामुळे किमान तीन ते चार तास वेळ वाया जाणार आहे.

सहा घरांची पडझड

वादळी पावसाचा तडाखा कोकणातील हर्णे गावालाही बसला आहे. हर्णेमधील बौध्दवाडीतल्या 6 घरांची पडझड यामुळे झाली. तसेच किना-यावर आणून ठेवलेल्या नौकांचही नुकसान झालंय. हर्णेच्या समुद्राला उधाण आलं असून बौध्दवाडीजवळच्या डोंगरावर असलेल्या घरांना दापोली तहसिलदारांकडून धोक्याचा इशारा देण्यात आला. हर्णे समुद्रात असलेल्या फतेगड किल्ल्याच्या भिंतीही या वादळी पावसाने ढासळल्या आहेत. येत्या 24 तासात कोकणा किनारपट्टीवर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरीकांनी जीव धोक्यात घालू नये असं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलंय.

close