आदर्श प्रकरणी विलासरावांनी ढकलली अशोकरावांवर जबाबदारी

June 17, 2011 4:46 PM0 commentsViews: 9

17 जून

आदर्श सोसायटी प्रकरणी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी आपलं प्रतिज्ञापत्र न्यायालयीन आयोगासमोर सादर केलं आहे. एकूण 15 पानांचे हे प्रतिज्ञापत्र असून आपल्यावरची सर्व जबाबदारी त्यांनी या प्रतिज्ञापत्राद्वारे तत्कालीन महसूल मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि इतर खात्यांवर ढकललेली आहे.

न्यायालयीन आयोगासमोर अखेर विलासराव देशमुखांनी आदर्श प्रकरणी आपलं प्रतिज्ञापत्रं सादर केलं. या प्रतिज्ञापत्रात आदर्श सोसायटीची जागा ही राज्य सरकारचीच असल्याचे विलासराव देशमुखांनी म्हटलं आहे. जागा हस्ताणतरीत करण्याचा सर्वस्वी अधिकार हा महसूल खात्याचा होता.

नियमानुसार याकामी जिल्हाधिकारी महसूल विभागाला मदत करत असतात. ही प्रक्रिया झाल्यानंतर नगर विकास खात्याचे सचिव आणि प्रधान सचिव त्यांच्याकडून फाईल तपासून आपल्याकडे आल्याचे विलासरावांनी म्हटलं आहे. ही जागा कारगिल शहीदांसाठी आरक्षित नव्हतीच असाही त्यांनी दावा केला. आदर्श सोसायटीला देण्यात आलेला बेस्टचा एफएसआय हा कायद्यनुसार देण्यात आल्याचे त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.

एकंदरीतच, आदर्श प्रकरणी विलासराव देशमुखांवर करण्यात आलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले आहे. पण या प्रतिज्ञापत्राद्वारे विलासरावांनी तत्कालीन महसूल मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास खात्याचे तत्कालीन प्रधान सचिव रामानंद तिवारी यांना अडचणीत आणण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

विलासरावांनी आदर्शला जागा देण्यासंबंधीचा निर्णय असेल किंवा आदर्शला देण्यात आलेल्या परवानग्यांचा विषय असेल या सर्वाचे खापर अप्रत्यक्ष रित्या अशोक चव्हाण आणि नोकरशाहीवर फोडलं. 'पहले आप पहले आप' करता करता विलासरावांना अशोक चव्हाणांच्या आधीच प्रतिज्ञापत्र सादर करावे लागलं. त्यामुळे अशोक चव्हाण आता आपल्या प्रतिज्ञापत्रात काय मुद्दे मांडतात याकडे सर्वांच लक्ष लागून आहे.

close