शिवसेना @ 45 ; नवा भिडू नवा डाव !

June 19, 2011 2:54 PM0 commentsViews: 1

विनोद तळेकर, मुंबई

19 जून

आज शिवसेनेचा 45 वा वर्धापनदिन मुंबईतल्या षण्मुखानंद सभागृहात साजरा होत आहे. पंचेचाळीस वर्षांनंतर आज शिवसेनेसमोरची आव्हानं काय आहेत त्याचा घेतलेला हा आढावा.

एकेकाळी मुंबईत आवाज कुणाचा… अशी तारस्वरातली घोषणा आली की त्याला आवाज शिवसेनेचा असा प्रतिसाद मिळायचा. स्थापनेनंतर सुरूवातीच्या काळात 70 टक्के सामाजिक आणि 30 टक्के राजकीय संघटना असं स्वरूप असलेली शिवसेना पुढच्या काळात 100 टक्के राजकीय पक्ष बनली.

आता या 45 व्या वर्षात शिवसेनेला काही मोठ्या आव्हानांना तोंड द्यायचं आहे. त्यापैकी येत्या महापालिकांच्या निवडणुकीत मुंबई आणि ठाण्यातील सत्ता राखणं हा मुद्दा प्रामुख्याने शिवसेनेच्या अजेंड्यावर आहे. त्यासाठी त्यांना भाजपची गरज लागणार आहे. आणि सध्या मुंडे प्रकरणावरून भाजपमध्ये निर्माण झालेली अस्थिरता आपल्याला मानवणारी नाही हे शिवसेनेच्या लक्षात आलंय.

एकीकडे भाजपमधील राजकीय अस्थिरता शिवसेनेच्या चिंतेचा विषय असला तरी सध्या नव्याने साथीला आलेला युतीतला नवीन भिडू आरपीआय ही शिवसेनेसाठी येत्या महापालिका निवडणुकीत जमेची बाजू आहे.

शिवशक्ती भीमशक्तीमुळे शिवसेनेला भविष्यातील निवडणुकांमध्ये फायदा होणार हे नक्की आहे. पण त्यासाठी आपल्या अनेक इलेक्टिव्ह मेरीट असलेल्या म्हणजेच निवडून येण्याजोग्या जागा त्यांना आरपीआयच्या उमेदवारांसाठी सोडाव्या लागतील. आणि त्यामुळे पक्षांतर्गत नाराजांची संख्या वाढू शकते. त्यातच मनसेसारखा तगडा प्रतिस्पर्धीही शिवसेनेला येत्या महापालिका निवडणुकीत टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनानंतर येणारे आगामी वर्ष शिवसेनेसाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे.

close