जगबुडी नदीवरचा पूल खचण्याची शक्यता

June 20, 2011 10:05 AM0 commentsViews: 23

20 जून

मुंबई गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील भरणे नाका इथं असणार्‍या जगबुडी नदीवरचा पूल धोकादायक झाला आहे. हा पूल खचल्यामुळे तसेच या पुलाला भेगा पडल्यामुळे कधीही पडू शकतो. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग 17 वरील हा महत्वाचा पूल आहे. त्यामुळे हा पूल कोसळला तर संपूर्ण मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे.

2005 साली झालेल्या अतीवृष्टीमध्ये या पुलाची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली होती. या पुलावरील डांबरी रस्ताही उखडला गेला होता. पण राष्ट्रीय महामार्ग विभागाने फक्त तात्पुरती दुरुस्ती केली होती. आणि त्यामुळे आता या पुराची दयनीय अवस्था झाली आहे.

या पुलाच्या दोन्ही बाजुंच्या संरक्षक भिंती पडल्यामुळे गेल्या वर्षभरात अनेक अपघात या पुलावर झालेले आहेत. 1930-31 साली ब्रिटिशांनी हा पूल बांधला होता. हा पूल 118.20 मीटर लांब आणि 6.80 मीटर रुंद आहे.

10.75 मीटरचे 11 गाळे या पुलाला आहेत. या पुलाची वयोमर्यादा संपल्याचे पत्र तीन वर्षापूर्वीच ब्रिटिश सरकारने महामार्ग विभागाला पाठवलं. पण त्यावर अजून काहीही कारवाई केली गेलेली नाही आणि त्याची दुरुस्तीही करण्यात आलेली नाही.

close