मुंडेंना काँग्रेसचा हात ?

June 20, 2011 3:18 PM0 commentsViews: 5

20 जून

पाणीच पाणी चहुकडे, गेले मुंडे कुणीकडे, अशी चर्चा आज दिवसभर होती. नाराज गोपीनाथ मुंडे आता पुढचं पाऊल काय टाकतात यावरून चर्चेला उधाण आलंय. मुंडे आज पुन्हा दुपारपासून गायब म्हणजे नॉट रिचेबल झाले आहे.

त्यामुळेच दिवसभर चर्चेला ऊत आला आणि मुंडे काँग्रेसच्या वाटेवर आहेत की काय अशी कुजबूज सुरू झाली. सूत्रांच्या माहितीनुसार गोपीनाथ मुंडे काँग्रेसच्या संपर्कात आहेत.

भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या विदर्भातल्या एका माजी खासदाराच्या मार्फत त्यांनी काँग्रेसशी संपर्क साधला. मुंडेंना काँग्रेसने केंद्रात कॅबिनेट पद आणि राज्याच्या मत्रिमंडळात एक राज्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचं समजतं आहे. पण मुंडे भाजपमध्ये राहायचं की काँग्रेसमध्ये जायचं याबाबत अंतिम निर्णय मुंडेंनी अजून घेतला नाही.

मुंडे अजूनही दिल्लीतच आहेत. पण भाजपचे वरिष्ठ नेते कोणता निर्णय घेतात याकडे त्यांची नजर आहे. जोपर्यंत हा निर्णय होत नाही. तोपर्यंतही मुंडे आपले पत्ते खुले करणार नाहीत असं त्यांच्या निकटवर्तीयांनी आयबीएन-लोकमतला सांगितलं. तसेच या विषयावर बोलायला काँग्रेस, भाजपच्या सर्व प्रवक्त्यांनी नकार दिला. त्यामुळेच शंका, कुशकांना वाव मिळाला.

दरम्यान काल रात्री मुंडे यांनी लालकृष्ण अडवाणी याची भेट घेतली होती आणि चर्चा सकारात्मक झाल्याचं म्हटलं होतं. पण नाराजी मात्र पूर्णपणे दूर होवू शकली नव्हती. लालकृष्ण अडवाणींच्या निवासस्थानी आज पुन्हा बैठक झाली.

या बैठकीला नितीन गडकरी, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू, राजनाथ सिंग, अनंत कुमार हे नेते उपस्थित होते. पण अजूनही मुंडेंच्या नाराजीवर तोडगा निघू शकलेला नाही. उद्या प्रदेश भाजपचीही मुंबईत बैठक बोलावण्यात आली आहे.

मुंडेंच्या मागण्या

- खासदारकीचा राजीनामा देऊन राज्यात परतण्याची इच्छा- विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद हवं- मुलगी पंकजाला खासदारकी मिळावी

मुंडेंपुढचे पर्याय

- मुंडे तडजोड करून भाजपमध्येच राहणार – राज्याच्या राजकारणात मुंडेंना भाजपकडून काही अधिकार मिळणार – मुंडे भाजप सोडणार आणि काँग्रेसमध्ये जाणार – मुंडे आपल्या समर्थकांना घेऊन वेगळा गट स्थापन करणार

तर आपण नाराज आहोत, अशी जाहीर कबुली त्यांनी गेल्या शुक्रवारी मीडियासमोर दिली. पण, सुरुवातीला त्यांनी आपली नाराजी मीडियापासून लपवण्याचा प्रयत्नही केला. जसजसे मुंडे मीडियासमोर येत गेले त्यांच्या मुद्राही बदलत गेल्या.

पावसाचा अंदाज घेण्यासाठी बैठक बोलावल्याचे सांगत मुंडेंनी सुरूवातीला मीडियाला टाळलं. पण या बैठकीत मुंडेंनी नेमका काय अंदाज घेतला ते त्यांनी त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून उघड झालं. मुंडेंनी नाराजी तर व्यक्त केलीच पण गडकरींना अप्रत्यक्ष टोलाही लगावला.

पण मग दिल्लीतील बैठकीआधी मुंडेंनी पुन्हा मीडियाशी अबोला धरला. अखेर दिल्लीत बैठक झाली पण मुंडेंची नाराजी दूर झालं नसल्याचे त्यांच्या चेहर्‍यावरुन स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे मुंडेंच्या या अवस्थेबद्दल सुचतात त्या चार ओळी…

चेहरा मनाचा आरसा, शब्दांचा भावार्थ खोटा असतो,मनातले भाव चेहर्‍यावर उमटतात चेहरा कधी बेईमान नसतो..

close