अण्णा उपोषणावर ठाम ; सरकार दिशाभूल करत असल्याचा आरोप

June 22, 2011 1:58 PM0 commentsViews: 4

22 जून

लोकपाल विधेयकाच्या मुद्द्यावर सरकार लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केला. सरकार आणि नागरी समिती यांच्यात मंगळवारी शेवटची बैठक झाली. पण मतभेद कायम राहिले. त्यानंतर आज अण्णा हजारेंच्या टीमने पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला.

भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची सरकारची इच्छाच नसल्याचा आरोप अण्णांनी केला. समांतर सरकार बनवण्याचा नागरी समितीचा प्रयत्न असल्याचा सरकारचा आरोप चुकीचा आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. आम्ही समांतर सरकार नाही तर लोकपालाला स्वायतत्ता देण्याची मागणी केल्याचे अण्णांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी यांची युती पाकिस्तानपेक्षाही जास्त धोकादायक असल्याची टीका त्यांनी केली. भ्रष्टाचाराविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार यावेळी नागरी समितीने व्यक्त केला. आणि आपण उपोषणावर ठाम असल्याचे अण्णांनी सांगितलं.

close