मुंडेंच्या शिष्टाई मागे सुषमांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न ?

June 22, 2011 5:11 PM0 commentsViews: 3

आशिष दीक्षित, नवी दिल्ली

22 जून

गोपीनाथ मुंडेंच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षातील अंतर्गत राजकारण ढवळून निघालंय. जिल्हा स्तरावरच्या प्रश्नावरून सुरू झालेलं हे भांडण आता दिल्लीच्या गटांमधली दरी वाढवायला कारणीभूत ठरतंय.

गोपीनाथ मुंडे आणि सुषमा स्वराज. दोघांचे संबंध काही फार जिव्हाळ्याचे नाहीत. मग सुषमांनी मुंडेंसाठी शिष्टाई का केली ? कारण सुषमा स्वराज यांची नजर आहे ती पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर. 2014 साली होणा-या निवडणुकीत. आपलं पक्षातलं स्थान बळकट करण्यासाठी त्या चाली चालत आहे. राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा नसलेले मुंडे हे सुषमांना ही उमेदवारी मिळवायला मदत करू शकतात. आणि म्हणूनच त्यांनी मुंडेंच्या बंडात उडी घेतली.

सुषमा स्वराज यांची भेट न्याय मिळण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. पंतप्रधानपदाची उमेदवारी मिळवण्यासाठी सुषमांचे मुख्य विरोधक आहेत अरूण जेटली. गडकरींनी गेल्या काही दिवसांत जेटलींची बाजू घेतल्यामुळे स्वराज आणि गडकरींचे संबंध बिघडलेत. त्यातच.. गडकरींचा पक्षांतर्गत शत्रू नाराज आहे हे कळल्यावर सुषमा एकाएकी जाग्या झाल्या. शत्रूचा शत्रू मित्र.. या न्यायाने त्यांनी मुंडेचं वकीलपत्र घेतलं.

मुंडे भाजपात राहिल्यामुळे गडकरींना मोठा झटका बसला आहे. राज्यामध्ये गडकरी गट आणि मुंडे गटातली दुही आता जास्त उघडपणे दिसण्याची शक्यता आहे. तर दिल्लीमध्ये मुंडेंच्या निमित्ताने सुषमा आणि जेटली गटातली दरी जास्त रुंदावण्याची शक्यता आहे.

close