बदनाम करणार्‍यांची लायकी समोर आली – मुंडे

June 23, 2011 8:53 AM0 commentsViews: 2

23 जून

मी भाजपमध्येच राहणार अशी घोषणा करून गोपीनाथ मुंडे आज मुंबईत पोहोचले. त्यांचं कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केलं. पण, मुंबई एअरपोर्टवर उतरल्या उतरल्या मुंडे एकदम आक्रमक झाले. मला बदनाम करण्याचा कट उधळला गेला.

मला बदनाम करणार्‍यांची लायकी जगासमोर आली असं आक्रमक विधान त्यांनी केलं. गोपीनाथ मुंडेंचा रोख सरळसरळ भाजप अध्यक्ष नितीन गडकरी आणि त्यांच्या समर्थकांवर होता.

ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर गडकरी गटाला शह देण्यासाठी राज्यात भाजपची पुनर्बांधणी करणार असल्याचे त्यांनी जाहीर केलं. आपण भाजपमध्येच आहोत आणि भाजपमध्येच राहणार असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.

भाजपमध्येच राहूनच पक्षांतर्गत विरोधकांना नामोहरम करण्याचा निर्धार आता मुंडेंनी केल्याचं दिसतंय. त्यामुळेच आपल्या नाराजीचा मुद्दा निकालात लागला असं त्यांनी स्पष्ट केलं.

तर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आपलं समाधान झालं असं मुंडेंनी म्हटलं आहे. यापुढेही आपण पक्षासाठीच काम करत राहणार असंही मुंडे म्हणाले.

दरम्यान, रामदास आठवले यांनी मुंडेंच्या भाजपमध्येच राहण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. एटीएम मधला एम आता आमच्यासोबत आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

close