मालेगाव बॉम्बस्फोटातील हिंदू दहशतवाद्यांवर एटीएसची मेहरनजर ?

November 12, 2008 4:25 PM0 commentsViews: 8

12 नोव्हेंबर, मुंबई सुधाकर कांबळे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या हिंदू दहशतवाद्यांना मोक्का लावला जात नाही. यामुळे एटीएस या हिंदू दहशतवाद्यांवर मेहरनजर दाखवत असल्याचं म्हटलं जातंय. यापूर्वी नांदेड बॉम्बस्फोट प्रकरणातही मोक्का लावला गेला नव्हता. त्यामुळेच मालेगावमध्ये बॉम्बस्फोट करण्याचं धाडस दाखवलं गेलं. यापूर्वी मुंबईत अनेक बॉम्बस्फोट झालेत. त्या प्रकणात अटक करण्यात आलेल्या अनेक आरोपींना मोक्का लावण्यात आलाय. मालेगाव प्रकरणात केवळ एका आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे हा मोक्का लागला. मात्र बॉम्बस्फोटात अटक करण्याच आलेल्या आठ जणांवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. 'एका गँगसाठी काम करणार्‍या उस्मानीवर मोक्का लावण्यात आला आहे ', अशी माहिती पोलीस सहआयुक्त (गुन्हे ) राकेश मारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. अटक करण्यात आलेल्यांमध्ये समीर कुलकर्णीवर जळगावमध्ये तलवारी वाटल्याचा गुन्हा दाखल आहे तर पुण्यातील खडकी इथं एका ख्रिश्चन धर्मगुरुवर हल्ल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल आहे. दुसरा आरोपी रमेश उपाध्यायवर विलेपार्ले पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल आहेत. हे दोन्ही गुन्हे महिलांच्या छेडछाडीचे आहेत. ते आयपीसी 354 नुसार दाखल करण्यात आले आहेत. तिसरा आरोपी राकेश धावडे जवळ 6 विदेशी बनावटीची रिव्हॉल्व्हर सापडलीत. त्याचा परभणी बॉम्बस्फोटातही हात असल्याचा आरोप आहे. यामुळे मालेगावमधील सर्व आठही आरोपीना मोक्का लागू शकतो. मोक्का कायदा लावण्यासाठी दोन अटी आवश्यक असतात. एक म्हणजे अटक आरोपीपैकी एका व्यक्तीवर पूर्वीचे दोन गुन्हे असावेत आणि दुसरी अट म्हणजे अटक आरोपीपैकी एखादा सदस्य गेल्या दहा वर्षापासून संघटिक गुन्हेगारीमध्ये सक्रिय असायला हवा. या अटी त्यांनी कधीच पार केल्या आहेत. ' निवृत्त मेजर उपाध्यायवर मुंबईत दोन गुन्हे दाखल आहेत. या सार्‍यामुळे संशयाला जागा एटीएसच्या अधिकार्‍यांनी निर्माण केली आहे ', असं कायदेतज्ज्ञ अ‍ॅड अमीन सोलकर यांनी सांगितलं. आरोपींना मोक्का लावला असता तर पोलिसांना आरोपींची जास्त दिवसांसाठी पोलीस कोठडी मिळाली असती मात्र आरोपींना मोक्का न लावण्याच्या पोलिसांच्या निर्णयामुळे वेगळ्याच चर्चेला सुरूवात झाली आहे.

close