मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी स्वामी दयानंद पांडे एटीएसच्या ताब्यात

November 12, 2008 5:18 PM0 commentsViews: 2

12 नोव्हेंबर, मुंबई विनोद तळेकर मालेगाव बॉम्बस्फोटाप्रकरणी एका शंकराचार्याला एटीएसनं ताब्यात घेतलंय. स्वामी अमृतानंद उर्फ दयानंद पांडे असं या शंकराचार्याचं नाव आहे. जम्मू इथल्या शारदा सर्वज्ञ पीठाचा हा शंकराचार्य आहे. नाशिक कोर्टानं या शंकराचार्यांसाठी पकड वॉरंट जारी केलं होतं. सुरुवातीला लखनौ इथे शंकराचार्याची चौकशी होणार असून त्याला अटक होण्याची शक्यता आहे. कुठल्याही क्षणी या धर्मगुरुला अटक होईल. दुसरीकडं साध्वीचे गुरु अवधेशानंद यांनी साध्वी प्रज्ञा सिंगबाबत हात झटकलेत. दीक्षा दिल्यानंतर साध्वीशी संपर्क नव्हता, असं त्यांनी जाहीर केलंय.साध्वी प्रज्ञा सिंग हिला मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणात अटक झाल्यानंतर भगव्या कपड्यातील दहशतवादाचा चेहरा उघड होतोय. आता काशीतील एका धर्मगुरुला अटक करण्यासाठी एटीएस पोहोचलंय. हा धर्मगुरु कोकणात एका बैठकीला हजर होता. तिथे लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि साध्वी प्रज्ञा सिंगही हजर होते, असं एटीएसच्या तपासात आढळलंय. दरम्यान, काशी बद्रीनाथपीठाचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद यांनी साध्वीचं समर्थन केलंय.साध्वीच्या अटकेनं धार्मिक वर्तुळात खळबळ आहे. काशीचा धर्मगुरुही एटीएसच्या रडारवर असल्यामुळे संघपरिवारातील अस्वस्थता वाढलीय. रामदेवबाबा, शंकराचार्य साध्वीचं समर्थन करत असताना साध्वींचे गुरू मात्र हात झटकत आहे. ' माझे 5 लाख संन्यासी आहेत. प्रत्येकाची माहिती मी सांगू शकत नाही ', असं स्वामी अवधेशानंद यांनी सांगितलं. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास करतानाच आता एटीएसचा तपास धार्मिक बुरख्याआड दहशतवादी कारवाया करणार्‍यांपर्यंत पोहोचलाय.स्वामी अमृतानंद उर्फ दयानंद पांडे बाबत अधिक माहिती देताना जम्मू सीएनएन आयबीएनच्या रिपोर्टर पवन बाली यांनी अधिक माहिती दिली. दयानंद पांडे हा जम्मूमध्ये 5 वर्षांपासून वैदिक विश्व कल्याण संस्थेचा ट्रक चालवतो. तो मूळ महाराष्ट्राचा असून जम्मूमध्ये त्याचं येणं-जाणं होतं. अमरनाथ जमीन आंदोलनातही त्यानं भाग घेतला होता, अशी माहिती मिळाल्याचं पवन बाली यांनी सांगितलं.

close