दरवाढीवरुन काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपली

June 26, 2011 1:54 PM0 commentsViews: 1

26 जून

इंधन दरवाढ झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दरवाढीचा विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचं आवाहन केलं. त्यानुसार आज नांदेडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दरवाढीचा निषेध केला. पण आता या मुद्यावरुनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

कारण सत्तेत आहात तर जबाबदारीही घ्यायला शिका असा टोला विलासराव देशमुख यांनी अजित पवार यांना लगावला. दरवाढीची जबाबदारी फक्त काँग्रेसवर ढकलणे योग्य नसल्याची टीकाही विलासराव देशमुख यांनी केली. सांगली जिल्ह्यातील कवठे महाकाळ इथं एका कार्यक्रमात विलासराव देशमुख यांनी ही टीका केली.

एकीकडे विरोधी पक्ष इंधन दरवाढीचा निषेध करतायत तर सत्तेत सामील असलेली राष्ट्रवादी काँग्रेसही या दरवाढीविरोधात रस्त्यावर उतरली. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आदेशानंतर नांदेडमध्ये राष्ट्रादीच्या युवा शाखेनं महागाईच्या विरोधात निषेध व्यक्त केला.

त्यासाठी कार्यकर्त्यांनी बैलगाडीवरून मोर्चा काढला. या मोर्च्यामुळे भाग्यनगर पोलीस स्टेशनसमोर बराच वेळ वाहतूक खोळंबली. मोर्चा थोडा पुढे जाताच कार्यकर्त्यांमध्ये फोटो काढण्यासाठी चढाओढ सुरू झाली. ही स्पर्धा एवढी वाढली की कार्यकर्ते मोर्चा विसरून हाणामारीवर आले. शेवटी कार्यकर्त्यांना पोलिसांचा प्रसाद खावा लागला आणि मोर्चा फसला.

close