युपीए सरकार हाती घेणार ऑपरेशन ‘उजळ प्रतिमा’ !

June 28, 2011 6:18 PM0 commentsViews: 4

28 जून

पल्लवी घोषसोबत आशिष दीक्षित, नवी दिल्ली

अनेक घोटाळे आणि अण्णांच्या आंदोलनाला मिळालेल्या प्रतिसादानंतर केंद्रातील यूपीए सरकार आता खडबडून जागं झालं आहे. लोकांच्या मनातली सरकारची प्रतिमा उजळ व्हावी. म्हणून आता मनमोहन सिंग सरकार कात टाकणार आहेत. इतके दिवस मौन बाळगणारे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आता नियमितपणे संपादकांशी संवाद साधणार आहेत. आणि दुसरीकडे त्यांची तयारी सुरू आहे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल करण्याची.

पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग आता आपलं मौन सोडणार आहेत. आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारची बाजू स्वतः मांडणार आहेत. लोकपाल, ए राजांची अटक, काळा पैसा, इस्लामाबादेत झालेली भारत-पाक चर्चा अशा अनेक मुद्द्यांवर डॉ सिंग यांनी ब्रसुद्धा उच्चारला नाही. पण आता ते नियमितपणे संपादकांना भेटणार असून अवघड प्रश्नांचा सामना करणार आहेत. या मालिकेतली पहिली पत्रकार परिषद बुधवारी होणार आहे.

ऑपरेशन 'उजळ प्रतिमा'- सरकारची बाजू लोकांसमोर यावी, म्हणून पंतप्रधानांनी यापूर्वी एका विशेष मंत्रिगटाची स्थापना केली- या मंत्रिगटातील सदस्य दर आठवड्याला पत्रकार परिषद घेतात- पण पंतप्रधान एक शब्दही बोलत नसल्यामुळे विरोधकांची कडवट टीका- काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत अनेक मंत्र्यांनी इच्छा व्यक्त केली की पंतप्रधानांनी लोकपालच्या मुद्द्यावर भूमिका मांडावी

पण केवळ मीडियाशी संवाद साधून प्रतिमा सुधारणार नाही. याची पंतप्रधानांना कल्पना आहे. म्हणूनच येत्या आठवड्यात कॅबिनेटमध्ये मोठे बदल होणार आहेत. यंदा पंतप्रधान सर्वांत महत्त्वाच्या चार खात्यांनासुद्धा हात लावणार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे.

त्यामुळे गृहमंत्री चिदंबरम, संरक्षण मंत्री अँटनी, परराष्ट्र मंत्री कृष्णा आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांचीसुद्धा खाती पक्की नाही. अनेक राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाची नाजूक अवस्था लक्षात घेता. काही वरिष्ठ मंत्र्यांना पक्षकार्यासाठी पाठवलं जावं अशी सोनिया गांधींची इच्छा आहे. त्यामुळे तरुणांना मंत्रिमंडळात पदोन्नती मिळेल. आणि सरकारमधील मरगळ जाईल, अशी त्यांना अपेक्षा आहे. द्रमुकमधली वाताहत, तृणमूलचा झंझावात यामुळेही अनेक समीकरणं बदलली आहेत.

close