इंदापुरात रंगले तुकोबांचे तिसरे रिंगण

July 4, 2011 1:01 PM0 commentsViews: 2

04 जुलै

आज तुकोबारायांची पालखी इंदापूरमध्ये आली आहे. निमगाव केतकीहून ही पालखी इंदापूरमध्ये दाखल झाली.आज तुकोबांच्या पालखीचे तिसरं रिंगण रंगलं. वारकरी मोठ्या उत्साहात या सोहळ्यात सहभागी झाले. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास रिंगणाला सुरवात झाली.

सगळ्यात आधी धावले ते झेंडेकरी त्यानंतर तुळस घेऊन धावणार्‍या महिला वारकरी आणि नंतर वीणेकरी आणि मग टाळकर्‍यांनी एकच जयघोष करत रिंगण गाजवलं आणि शेवटी कळस चढवला तो मानाच्या अश्वांनी. अश्‍व धावताच लोखो वारकर्‍यांनी विठूनामाचा गजर करत कीर्तनाची जी द्रुत ताल पकडली ती इंदापूरच्या आसमंतात मग कित्येक क्षण गर्जतच राहिली.

जवळपास तासभर इंदापूरकरांनी या रिंगणाचा आनंद लुटला. यापूर्वी पिंपरी चिंचवड इथे महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण झालं. त्यानंतर बेलवडी इथे गोल रिंगण झालं आणि आज तिसरं रिंगण रंगलं. यानंतर आता चौथं रिंगण अकलूजला रंगणार आहे. रिंगणानंतर आज इंदापूरमध्येच पालखीचा मुक्काम असेल आणि उद्या पालखी रवाना होईल ती सराटीकडे..

close