सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणारा विंचूरकर वाडा पडद्याआड

July 5, 2011 4:55 PM0 commentsViews: 11

अद्वैत मेहता, पुणे

05 जुलै

पुण्याचं वैभव असलेला विंचूरकरवाडा आता पडद्याआड जाणार आहे. याच वाड्यातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली होती. पुण्यातल्या प्रसिध्द परांजपे बिल्डरनी ही वास्तू आणि आजूबाजूची जागा विकत घेतली आहेत.

1894 साली लोकमान्य टिळकांनी पुण्यातून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरवात केली. कुमठेकर रस्त्यावरच्या सरदार विंचूरकरवाड्यात गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आणि गणेशोत्सवाला सुरूवात झाली.. टिळक या वाड्यात काही काळ राहीले होते. या वाड्यात ते कायद्याचा शिकवणी वर्गही चालवायचे.केसरीचं कार्यालयही इथचं होतं. पण आता ही ऐतिहासिक वास्तू परांजपे बिल्डरना विकण्यात आलीय.

वाड्याचे मालक कृष्णकुमार दाणी यांनी या वास्तूचा पुनर्विकास परांजपे बिल्डरना करायला परवानगी दिली. विंचूरकर वाड्यासह एकूण 18 हजार स्क्वेअर फूट असलेल्या या जागेत सध्या काही भाडेकरू राहत आहेत. तसेच खादी ग्रामोद्योग मंडळाचही एक कार्यालय या परिसरात आहे.

अनेक ऐतिहासिक घडामोडींचा साक्षीदार असलेल्या विंचूरकरवाड्याचा संरक्षित स्मारकांच्या यादीत समावेश करण्यात यावा असा प्रस्ताव पुणे महापालिकेपुढे आला होता.

दरवर्षी गणेसोत्सवाच्या काळात अनेक इतिहासप्रेमी नागरिक, पुणेकर, पर्यटक तसेच पुढारी-राजकीय नेते विंचूरकर वाड्याला आवर्जून भेट देतात. इतिहासाचा मोठा वारसा सांगणार्‍या या वास्तूचा हा वारसा भविष्यातही जपला जाणार का हाच प्रश्न या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे.

close