महाराष्ट्र साखर संघाचे प्रकाश नाईकनवरे पदमुक्त

July 7, 2011 2:29 PM0 commentsViews: 11

07 जुलै

महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांना पदमुक्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तो साखर संघाने स्वीकारल्याची माहिती साखर संघाचे अध्यक्ष विजय सिंह मोहिते पाटील यांनी आयबीएन लोकमतला दिली.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार साखर संघाचे सर्वसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी प्रकाश नाईकनवरे यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. 2007-08 मध्ये साखर संघाने राज्यातील 30 साखर कारखान्यांची जवळपास साडे 19 लाख मेट्रीक टन कच्ची साखर निर्यात केली होती. त्यासाठी साखर संघाने 1750 रुपये प्रती टन इतका वाहतूक खर्च कारखान्यांवर आकारला होता.

यापैकी 750 रुपये प्रती टन इतका खर्च जादा आकारण्यात आल्याचे उघडकीस आलं होतं. या घोटाळ्यात प्रकाश नाईकनवरे यांचा सहभाग असल्याच्या कारणावरून मुंबई हायकोर्टात याचीका दाखल करण्यात आली. हे प्रकरण आयबीएन लोकमतने 2009 च्या हिवाळी अधिवेशनात उचलून धरले होते.

त्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या वतीने मुंबई हायकोर्टात जनहीत याचिका दाखल करण्यात आली. या प्रकरणी हायकोर्टाने राज्यसरकारला प्रतिज्ञापत्रही सादर करायला सांगितलं आहे. येत्या 21 जुलै याप्रकरणाची सुनावणी असल्याने त्याआधीच प्रकाश नाईकनवरे यांना पदमुक्त केल्याची चर्चा आहे.

close