केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या प्रक्रियेला वेग

July 8, 2011 3:24 PM0 commentsViews: 1

8 जुलै

येत्या एक-दोन दिवसांत पंतप्रधान मनमोहन सिंग केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. 2 जी घोटाळ्याप्रकरणात द्रमुकचे नेते आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दयानिधी मारन यांनी गुरुवारी राजीनामा दिला. त्यापूर्वी दूरसंचार ए. राजा यांचं पद गेलं होतं. त्यामुळे द्रमुकच्या या कमी झालेल्या दोन जागांवर कुणाची वर्णी लागते, याबद्दल उत्सुकता आहे. द्रमुकनं आपल्या वाट्याच्या जागांवर अजूनपर्यंत दावा केला नसल्याचं द्रमुकच सूत्रांनी सांगितलंय. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी द्रमुकचे अध्यक्ष करुणानिधी यांची भेट घेणार आहेत. पण, कॅबिनेटमध्ये येण्यासाठी द्रमुककडे स्वच्छ प्रतिमेचा प्रबळ दावेदार नाही. याची द्रमुकला जाणीव असल्यानं त्यांच्याकडून कोणतीच मागणी केली जात नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. दुसरीकडे मुरली देवरा यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव सोनिया गांधींकडे दिलाय. तर काही ज्येष्ठ मंत्र्यांच्या खात्यांमध्येही बदल होण्याची चर्चा आहे.

दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यानीही पुन्हा एकदा यूपीएमध्ये येण्याचे प्रयत्न सुरू केलेत. आपल्या पक्षाला मंत्रिमंडळात जागा मिळावी, यासाठी लालूप्रसाद आठवड्याभरापासून दिल्लीत लॉबिंग करत आहेत. त्यासाठी ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात आहेत. आणि स्वतःला कॅबिनेट मंत्रिपद मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे…राष्ट्रीय जनता दलाचे फक्त 4 खासदार आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत लालूंनी रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीशी युती केली होती. निवडणुकीत त्यांना सपाटून मार खावा लागला. त्यामुळे यूपीए-1 मध्ये रेल्वेमंत्री असणा•या लालूप्रसादांचा यूपीए-2 मध्ये समावेश झाला नाही.

close