साधनाताई आमटे यांचे निधन

July 9, 2011 12:10 PM0 commentsViews: 60

09 जुलै

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या साधनाताई आमटे यांचं आज निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. गेले काही महिने त्या कॅन्सरने आजारी होत्या. 1946 साली आनंदवन उभं करणार्‍या बाबा आमटे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यानंतर बाबांसोबत त्यांनीही आपलं आयुष्य समाजकार्यासाठी वेचलं. 'समिधा' हे त्यांचं आत्मचरित्रपर पुस्तक गाजलं. बाबा गेल्यानंतर तीन वर्ष त्यांचा मुक्काम आनंदवनातच होता.आज त्यांची प्राणज्योत मालवली तीही आनंदवनातच.

ज्यांना समाजाने झिडकारले अशांसाठी ज्यांनी स्वत:च्या आयुष्याची साधना केली. ज्यांनी बाबांच्या आयुष्यात अविरत समिधा वाहिल्या अशा साधनाताई. आनंदवनाच्या निर्मितीपासून ते नर्मदातिराच्या वानप्रस्थापर्यंत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंना साथ देणार्‍या साधनाताई. कुष्ठरोगासाठी आनंदवनचा चमत्कार घडवणार्‍या बाबांच्या कार्यात 62 वर्ष सहचारिणी बनून सहभागी झालेल्या साधनाताई. साधनाताई वृत्तीने धार्मिक. नागपूरच्या महालातील घुलेशास्त्रींचे घराणे हे त्यांचे माहेर. 18 डिसेंबर 1946 ला साधनाताईंनी बाबा आमटे या फकिर प्रवृत्तीच्या माणसाशी विवाह केला.

लहानपणीच बुद्धिमत्तेची चुणूक दाखवणार्‍या साधनेवर वडिलांच्या मृत्यूनंतर भावंडांची जबाबदारी पडली. शिक्षण मागे राहिलं. नियतीने जणू हा अनुभव जगावेगळा संसार सांभाळायला उपयोगी आणला. माहेरी रेशमी साड्यांचा व्यवसाय, पण लग्न झाल्यावर खादी साडी नेसू लागल्या.

बाबांच्या रोमारोमात रुजलेला गांधीवाद साधनाताईंनी आनंदाने स्वीकारला. आनंदवन उभं करताना कित्येक संकटं या दांपत्याने झेलली. छोटीशी झोपडी होती, तेव्हापासून अपार कष्ट झेलणार्‍या साधनाताईंनी जंगलातल्या प्राण्यांशी सामना, आनंदवनात येणार्‍या कित्येकांचा स्वयंपाक, धुणी-भांडी हे सगळं अगदी मनापासून केलं.

महारोग्यांची आयुष्य बाबांनी घडवली पण त्यांचे संसार उभे केले ते ताईंनी. आनंदवनात साधनाताईंच्या मातृत्वाचं योगदान मोठं आहे. कडक शिस्तीच्या बाबांच्या संतापाचा तडाखा अनेकांना बसायचा, असे अनेक प्रसंग त्या हळूवारपणे हाताळायच्या. मायेचा डोंगर करुन उभ्या रहायच्या. म्हणूनच त्या केवळ डॉ. प्रकाश आणि डॉ विकास यांची आई राहिल्या नाहीत. अवघ्या आनंदवनच्या त्या आई झाल्या. पण त्यांना संपूर्ण कुटुंबात ताईच म्हटलं जाई.

बाबांबद्दल बोलताना त्या म्हणायच्या-'आमच्या दोघांमध्ये 11-12 वर्षांचे अंतर. माझा नवरा म्हणजे म्हणजे ज्वालामुखी. तो शांत करायला मला बर्फाचा पर्वत व्हावे लागले असं सांगणार्‍या साधनाताई' बाबांच्या मागे पर्वतासारख्या उभ्या राहिल्या. बाबा आमटे जाऊन तीन वर्ष झाली. ते गेल्यापासून ताईंचा वेळ बाबांच्या आठवणीत जायचा. कित्येक संकटं पार केलेल्या ताईंना आयुष्याच्या उत्तरार्धात कॅन्सरने गाठलं. या दु:खालाही त्या पुरुन उरल्या.

समिधा हे आत्मचरित्रपर पुस्तक म्हणजे साधनाताईंच्या अलौकिक सहजीवनाची कहाणी. समिधाची प्रस्तावना लिहिताना जेष्ठ साहित्यिक राम शेवाळकर म्हणतात- 'साधना आमटे वाचकांच्या लेखी हिमालयाची सावली ठरतील. पण खरं म्हणजे त्यांना हिमालयाची माऊली म्हणणं अधिक न्यायाचं होईल.' अशी ही अबोल, कनवाळू माऊली आज आपल्यातून निघून गेली. साधनाताईंना आयबीएन लोकमतची भावपूर्ण श्रद्धांजली…

close