मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत पंतप्रधानांची सोनियांशी चर्चा

July 9, 2011 4:35 PM0 commentsViews: 4

09 जुलै

मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. मंत्रिमंडळात फेरबदल सोमवारी होण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग यांनी याबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली. तृणमूल काँग्रेसची यादी तयार आहे.

महत्त्वाच्या चार खात्यांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असं जवळपास निश्चित झालं आहे. आदर्श प्रकरणी अडचणीत आलेले केंद्रीय ग्रामविकास मंत्री विलासराव देशमुख स्कॅनरखाली आहेत. तर, एम. एस. गिल, बी. के. हंडि यांच्यासारख्या अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे.

तर, केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी द्रमुकला रिकाम्या झालेल्या दोन मंत्रिपदाची ऑफर दिली. पण द्रमुकने मात्र आपल्याकडून अजून कोणताच निर्णय घेतला नाही. ही ऑफर स्वीकारणे म्हणजे पक्ष कवकुवत झाल्याचे मान्य करणे असा अर्थ निघेल. तसेच कनिमोळी यांच्या अटकेचा द्रमुकने निषेध केला नाही असाही संदेश जाईल अशी भीती द्रमुकला वाटतेय. पण पक्षातल्याच काही जणांची इच्छा मात्र ही ऑफर स्वीकारावी अशी आहे. 23 जुलैला द्रमुकच्या कार्यकारणीची बैठक होतेय. त्यानंतरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

close